

नांदेड(प्रतिनिधी)- लोहा येथे एका शिक्षकाचे घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 31 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. किनवट आणि नांदेड शहराच्या पुर्णा रोड भागातून 32 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल चोरीला गेले आहेत. शहरातील वजिराबाद आणि शिवाजीनगर भागातून 65 हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. आ.अमरनाथ राजूरकर यांच्या सत्कार कार्यक्रमात एका व्यक्तीच्या खिशातून 18 हजार 120 रुपये चोरीला गेले आहेत. या एकूण चोरी प्रकारांमध्ये 2 लाख 37 हजार 20 रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे.
लोहा येथील शिक्षक कॉलनीत राहणारे शिक्षक संजय लिंबाजी सोमवंशी यांच्या घरातून 12 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 3.30 ते 3.45 अशा फक्त 15 मिनिटात त्यांच्या घरातील 60 हजार रुपये रोख रक्कम आणि 71 हजार 900 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिणे असा एकूण 1 लाख 31 हजार 900 रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेण्यात आला आहेे. लोहा पोलीसांनी हा जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक मारोती सोनकांबळे हे करीत आहेत.
किनवट शहरातील सार्वजनिक रस्त्यावरून 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 5.30 वाजेच्यासुमारास शिवाराज बामणीकर यांचा 20 हजार रुपये किंमतीचा मोबाईल कोणी तरी चोरला आहे. दि.12 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 1 वाजता पुर्णा रोड येथे 2 युवकांनी किरण भिमाशंकर पत्रे यांना परभणीला जाणारा रस्ता विचारला आणि त्यांच्या खिशातील 13 हजार रुपयांचा मोबाईल चोरून पळ काढला.
रेल्वे स्टेशन येथील बसस्टॅन्ड समोरून 24 ऑक्टोबर रोजी नामदेव धरमु राठोड यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.आर.3684 ही 30 हजार रुपये किंमतीची गाडी चोरीला गेली आहे. 11 नोव्हेंबर रोजी दर्शन बाबासाहेब खांडेकर यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.वाय. 0647 ही 35 हजार रुपये किंमतीची गाडी चोरीला गेली आहे.
आमदार राजूरकरांच्या सत्कार समारंभात चोरट्यांनी मारला डल्ला
दि.2 नोव्हेंबर रोजी देगलूर येथील भक्तापुर रोडवर दुपारी 4 वाजता आ.अमरनाथ राजूरकर यांचा सत्कार समारंभ होता. नांदेड येथील यादव शिवराम ढाले हे त्या कार्यक्रमासाठी नांदेडहून गेले होते. या कार्यक्रमाच्या गर्दीत एकीकडे आ.अमरनाथ राजूरकर यांचा सत्कार सुरू होता तर दुसरीकडे चोरट्यांनी यादव शिवराम ढाले यांच्या खिशावर हात फिरवून 18 हजार 120 रुपये चोरून नेले आहेत. देगलूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.