उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय यावर लक्ष ठेवणार
नांदेड(प्रतिनिधी)-गेली 15 दिवस सुरू असलेल्या एस.टी.संपामुळे राज्यात प्रवाशांची झालेली दुर्धर अवस्था बदलण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने खाजगी गाड्यांना प्रवाशी वाहतुक करण्यास सांगितले आहे. या बद्दल कांही तक्रार असेल तर प्रवाशांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दुरध्वनी क्रमांकावर आणि राज्याच्या ईमेल पत्यावर संपर्क करावा असे प्रसिध्द पत्रक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी जारी केले आहे.
प्रसिध्दीसाठी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, एस.टी.विभागाने पुकारलेल्या बेमुद संपच्या पार्श्र्वभूमीवर प्रवाशी वाहतुक करणाऱ्या बस, स्कुल बस संघटना यांच्या प्रतिनिधींशी बैठक करून त्यांची सर्व वाहने प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. संप कालावधीमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालय 24 तास नियंत्रण कक्षाच्या माध्यमाने सुरू राहणार आहे. कार्यालयातील वायूवेग पथकाचे अधिकारी विविध तालुक्यातील बस डेपोला भेट देवून प्रवाशांसाठी उद्घोषणा करतील. वायूवेग पथकामार्फत खाजगी बस वाहनांची तपासणी करून जादा भाडे आकारणी व इतर सुविधांबाबत प्रवाशांकडून माहिती घेत आहेत. हिंगोली गेट, बाफना टी पॉईंट, एसटी स्टॅन्ड बाहेर तसेच जिल्ह्यातील विविध बसस्थानकांजवळ इतर खाजगी वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत अशी एकूण 158 वाहने आहेत.
संपाच्या अनुषंगाने प्रवाशांची गैरसोय होवू नये म्हणून खाजगी बस, स्कुल बस, मालवाहु वाहन या मध्ये प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. याबाबत कांही तक्रार असेल तर कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 02462-259900 आणि महाराष्ट्राच्या ईमेल क्रमांक mh26@mahatranscom.in यावर सुध्दा माहिती देता येईल आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय त्याची त्वरीत दखल घेईल.
