नांदेड जिल्ह्यातील दबंग पोलीस अंमलदार म्हणून प्रसिध्द असलेले उत्तम शंकरराव वरपडे पाटील आपल्या पोलीस जीवनात भल्या-भल्या गुन्हेगारांना पाणी पाजले. पण कांही व्यक्तीगत कारणांसाठी त्यांच्याविरुध्द वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल केले. त्याचे कारण उत्तम वरपडेचे सत्य आणि कडक सादरीकरण होते. पोलीस नोकरी करतांना मी जनतेचा सेवक आहे. कोण्या साहेबाच्या घरचा गडी नाही अशी भावना ठेवून उत्तम वरपडेंनी आपली सेवा बजावली. कांही कारणांनी त्यांच्यावर आलेल्या प्रसंगातून त्यांना निलंबन आणि पुढे बडतर्फी नशीबी आली. ती सुध्दा त्यांनी अत्यंत कणखर मनाने सोसली. पोलीस महासंचालक कार्यालयाने त्यांची बडतर्फी रद्द करतांना भारतीय संविधानातील अनुच्छेदमधील कलम 311(2)(ब) चा चुकीचा वापर करून वरपडेचे निलंबन केले होते असे लिहुन वरपडेला न्याय दिला होता.
त्यानंतर पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पोलीस अंमलदारांच्या कल्याणासाठी अनेक योजना आखल्या. त्यात कर्मचाऱ्यांच्या वयोमानानुसार त्यांना पोलीस उपनिरिक्षक पदी पदोन्नती मिळाली. त्यात उत्तम वरपडे यांना सुध्दा पोलीस उपनिरिक्षक पद प्राप्त झाले आणि त्यांची नियुक्ती शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्यात झाली. या पोलीस ठाण्याचा उपविभाग शहर पोलीस उपविभाग आहे. या विभागाचे अधिकारी पोलीस उपअधिक्षक श्री.चंद्रसेनजी देशमुख हे आहेत. ज्यांचे नाव नांदेड जिल्ह्याला सन 1998 पासून माहित आहे. त्यांची काम करण्याची पध्दत सर्वात छोट्या व्यक्तीला सुध्दा माहित आहे. यांच्यासोबत काम करतांना अनेक घटनाक्रम घडले आणि त्यांनी पोलीस उपनिरिक्षक उत्तम वरपडे यांचा पिच्छा पकडला.
आज दि.10 नोव्हेंबर रोजी पोलीस उपनिरिक्षक उत्तम वरपडे यांनी पोलीसांचा देव असलेल्या पोलीस महासंचालक संजय पांडे यांना अर्ज पाठवला. हा अर्ज पोलीस निरिक्षक वजिराबाद, पोलीस अधिक्षक नांदेड आणि पोलीस उपमहानिरिक्षक नांदेड यांच्या मार्फतीने पाठवला. यावर वजिराबाद पोलीस ठाण्यात सध्या प्रभारी पोलीस निरिक्षक म्हणून कार्यरत असलेले दत्तात्रय निकम यांनी दाखल पाहुन रवाना ही स्वाक्षरी केली नाही. तरीपण उत्तम वरपडे यांनी हे अर्ज पोलीस अधिक्षक कार्यालयात सादर करून त्याची पावती घेतली आहे. आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या ईमेलवर आपला अर्ज पाठवला आहे.
या अर्जाचे शिर्षक मृत्यू वाचविण्यासाठी राजीनामा असे असे आहे. ज्यामध्ये आज 10 नोव्हेंबर रोजी एका गुन्ह्याच्या संदर्भाने पोलीस निरिक्षक दत्तात्रय निकम आणि मला श्री. चंद्रसेनजी देशमुख यांनी आपल्या कक्षात बोलावून फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार मला मिळालेल्या अधिकारांवर गदा आणतांना अत्यंत अपमानजनक वागणूक दिली. त्यामुळे मला मृत्यूशिवाय दुसरा पर्याय नाही हे लिहितांना दु:ख होत आहे की, महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीसाच्या मनात देव अशी संज्ञा असलेल्या संजय पांडे यांच्या कार्यकाळात असे लिहावे लागत आहे. मी श्री.चंद्रसेनजी देशमुख यांची वसुली करण्यासाठी नकार दिला म्हणून ते कांहीना कांही कारणाने माझ्या विरुध्द वागत असतात असे अर्जात लिहिले आहे. माझ्या विरुध्द निलंबनाची कार्यवाही करणाऱ्या अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून श्री. चंद्रसेनजी देशमुख माझ्यासोबत असे वागतात. ज्यामुळे माझ्या सेवाकालखंडाच्या शेवटच्या सत्रात माझ्यावर कोणतीतरी खोटी कार्यवाही करून मला त्रास दिला जाईल. असे झाले तर मला मृत्यूशिवाय पर्याय शिल्लक राहणार नाही म्हणूनच मी आपल्याकडे राजीनामा अर्ज सादर केला आहे. मला होणाऱ्या वरिष्ठ आणि अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या त्रासातून वाचवावे अशी विनंती उत्तम वरपडे यांनी केली आहे.