नांदेड(प्रतिनिधी) -बाबानगर भागात एका बांधकामावर जावून तीन दरोडेखोरांनी तेथून गजाळी आणि लोखंडी प्लेट चोरून नेल्या आहेत. वसंतनगर भागात एका घरातून चोरी झाली आहे. हिमायतनगर येथे एक दुकान फोडून चोरट्यांनी सोयाबीन चोरले आहे. पळसा शिवारात बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. या सर्व चोरी प्रकारांमध्ये 96 हजारांचा ऐवज लंपास झाला आहे.
संभाजी रावसाहेब कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 3 नोव्हेंबरच्या पहाटे 4.30 ते 5 वाजेदरम्यान बाबानगर भागात ते ऍड. भोसले यांच्या बांधकाम सुरू असलेल्या जागी वाचमन म्हणून कार्यरत होते. त्यावेळी तीन जण आले आणि चाकुचा धाक दाखवून स्लॅब टाकण्याच्या लोखंडी प्लेट आणि गजाळी असा 27 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा जबरी चोरी सदरात दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक सोनकांबळे अधिक तपास करीत आहेत.
सतिश शामराव कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 4 नोव्हेंबरला दिवाळीच्या दिवशी रात्री ते बाहेर गेले असतांना चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला आणि एक तांब्याचा बंब, पितळी बकीट, कळशी असा 14 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा चोरीच्या सदरात दाखल केला आहे. पोलीस अंमलदार वाघमारे अधिक तपास करीत आहेत.
शरद राधेशाम चालय यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 4 नोव्हेंबरच्या रात्री अर्थात दिवाळीच्या रात्री सदाशिव मार्केट हिमायतनगर येथील त्यांच्या मालकीचे सहज ट्रेडींग कंपनी हे दुकान फोडून चोरट्यांनी त्यातून 20 सोयाबीनचे पोते 51 हजार रुपये किंमतीचे चोरून नेले आहेत. हिमायतनगर पोलीसांनी हा गुन्हा चोरीच्या सदरात दाखल केला आहे. पोलीस अंमलदार सिंगनवाड अधिक तपास करीत आहेत.
जयदीप उत्तम शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पळसा शिवारातील एका टावरमधील बॅटऱ्या 3-4 नोव्हेंबरच्या रात्री चोरून नेल्या आहेत. या बॅटऱ्यांची किंमत 4 हजार रुपये आहे. मनाठा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार पवार अधिक तपास करीत आहेत.
