पोलीस निरिक्षकाकडून तपास काढून सहाय्यक पोलीस निरिक्षकांना दिला
नांदेड(प्रतिनिधी)-फटाका व्यापाऱ्यावर जिव घेणा हल्ला करणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्या तिघांविरुध्द दाखल झालेल्या गुन्ह्यात मोठे “व्टिस्ट’ आले आहे. एखादा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या गुन्ह्यात कांही अडचणी आल्या तर ज्या अधिकाऱ्याकडे त्या गुन्ह्याचा तपास आहे. तो तपास वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठवला जातो. पण या प्रकरणाचा तपास पोलीस निरिक्षकाकडून काढून सहाय्यक पोलीस निरिक्षकाला दिल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षकाला दुसऱ्या पोलीस ठाण्यातून बोलविण्यात आले आहे हे त्यातील आणखी एक विशेष बाब आहे.
29 ऑक्टोबर रोजी फटका व्यापारी धनराज बद्रीनारायण मंत्री यांना फटका दुकानावर जावून तुझी चौकशी लावायची नसेल तर 40 हजारांची खंडणी दे असे सांगण्यात आले. त्यावेळी एकाने धनराज मंत्रीवर पिस्तुल रोखून ठोक दुंगा असे सांगितले. त्या आधारावर धनराज मंत्री यांनी 2 नोव्हेंबर रोजी तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा क्रमांक 397/2021 दाखल झाला. या गुन्ह्यात पवन जगदीश बोरा उर्फ शर्मा, दत्तात्रय पांडूरंग अनंतवार आणि गौतम नरसिंगदास हिरावत उर्फ जैन या तिघांची नावे आरोपीच्या सदरात आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचा तपास वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्याकडे देण्यात आला.
दोन दिवसात आरोपी मिळाली नाहीत त्यातील विशेष बाब म्हणजे एका आरोपीकडे तर पोलीस सुरक्षा रक्षक आहे. तरी पण आरोपी सापडले नाहीत. आज एक मोठे व्टिस्ट या प्रकरणात घडले. पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे कार्यरत सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे यांना वजिराबाद येथे पाठविण्यात आले आहे आणि गुन्हा क्रमांक 397 चा तपास रवि वाहुळे यांच्याकडे देण्यात आला आहे अशी खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.
या वृत्ताच्या संदर्भाने आम्ही कालच सुर्याजी पिसाळांच्यानंतर नांदेड जिल्हा पोलीस दलात मिर सादीकांची वाढ झाली असे नमुद केले होते. आज तर मिर सादीकांसोबत मिर जाफरांची सुध्दा वाढ या प्रकरणामुळे पोलीस दलात झाल्याचे दिसायला लागले आहे. आजपर्यंत पाहिलेल्या घटनाक्रमानुसार एखाद्या गुन्ह्यामध्ये तपासीक अंमलदाराच्या संदर्भाने कांही बदल केला गेला तर तो बदल त्या अधिकाऱ्याच्या पदाच्या बरोबरीच्या अधिकाऱ्यांकडे होतो किंवा त्या पदापेक्षा वरिष्ठ पदाकडे तो तपास वर्ग केला जातो असे पाहिले आहे. असा बदल झाला असेल तर हा पहिलाच गुन्हा आहे ज्यामध्ये पोलीस निरिक्षकाकडील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षकाला देण्यात आला आहे. यामागे काय गौड बंगाल असेल, कोणाचा हा आदेश असेल या बद्दल माहिती प्राप्त होत नाही पण ते कधी-न कधी नक्कीच पुढे येईल. एक विचारवंत म्हणतो की, इधर ये जबां कुछ बताती नहीं है, उधर आँख छिपाती भी नहीं है। खफा है मेहरबान है कौन जाने, हवा जब दिये को बुझाती है।। या युक्तीमध्ये या प्रकरणातला दिवा कोण आहे आणि हवा कोणती आहे. याचा सुध्दा शोध लागेलच.
