एका गाव नमुना आठवर सध्याचे आमदार आणि माजी सरपंच मोहनराव हंबर्डे यांची स्वाक्षरी
नांदेड(प्रतिनिधी)- विष्णुपूरी येथे गाव नमुना क्रमांक 8 वर ऑब्लिक हे चिन्ह लिहुन गायरान जमीनी इतरांना लिहुन देण्याचा नवीन प्रकार सुरू आहे. आपल्याच नातलगांना मारहाण करून, गुंडांच्या मदतीने जमीनी बळकावण्याचे प्रकार घडत आहेत. हाती आलेल्या एका गाव नमुना क्रमांकावर सन 2006 मध्ये विष्णुपूरीचे सरपंच असलेले आणि सध्या आमदार असलेले मोहनराव हंबर्डेे यांची स्वाक्षरी आहे.जमीनी बळकावण्याच्या प्रयत्नात कोणी पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे गेले तर त्यांना प्रतिसाद मिळत नाही याचे कारण आता लिहिण्याची सुध्दा गरज राहिली नाही.
नांदेड शहरापासून अत्यंत जवळ असलेल्या विष्णुपूरी या गावाची ख्याती अगोदर काळेश्र्वर महादेव मंदिरामुळे होती. जसा-जसा विकास झाला. तसा-तसा नांदेड लोहा रस्त्यावर असलेल्या विष्णुपूरी गावाचे महत्व वाढले. सर्वप्रथम अभियांत्रीकी महाविद्यालय आले त्यानंतर विद्यापीठ आले आणि आता सध्या शासकीय रुग्णालय सुध्दा विष्ण ुपूरी येथेच आहे. त्यामुळे विष्णुपूरी गावाची कधी काळी कवडी मोल भावाची जमीन आज सोन्याच्या दरापेक्षा मोठ्या दराची झाली आणि यातूनच हा गायरान जमीनी बळकावण्याचा प्रकार सुरू झाला. कांही दिवसांपुर्वी काही महिला एका महिलेला मारत आहेत असा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यांच्या आसपास गुंडप्रवृत्तीची मंडळी उभी आहे, असंख्य लोक ही मारहाण पाहत आहेत. पण त्यात कोणी दखल देत नाही असा तो व्हिडीओ होता. या संदर्भाने विचारणा केली असता ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांनी मागिल काही वर्षापासून सुरू केलेला हा जमीनी बळकावण्याचा प्रकार समोर आला. विष्णुपूरी येथील एक गाव नमुना क्रमांक 8 प्राप्त झाले. यामध्ये गायरान जमीनीच्या गटातील जुना घर क्रमांक 821/1 लिहुन पंचफुलाबाई पांडूरंगराव मोरे यांच्या हक्कात हे गाव नमुना लिहिलेले आहे. त्यावर 27 ऑक्टोबर 2006 अशी तारीख आहे. तत्कालीन सरपंच आणि सध्याचे आमदार मोहनराव हंबर्डेेे यांची त्या कागदावर स्वाक्षरी आहे. सोबतच ग्रामविकास अधिकारी संजय कानोडे यांची पण स्वाक्षरी आहे. ऑक्टोबरमध्ये हे गाव नमुना क्रमांक लिहिले गेले आणि 11 डिसेंबर रोजी पंचफुलाबाई मोरे यांनी ही जागा डॉ.विठ्ठल भगवानराव देशमुख यांना मुद्रांक क्रमांक 5949/2006 नुसार विक्रीखत करून विक्री केली. या जागेचे मोजमाप 334.57 चौरस मिटर आहे. गाव नमुना क्रमांक 8 मध्ये लिहिलेली चर्तु सिमा विक्री खतात सुध्दा लिहिलेली आहे. आपल्या जाती मालकी व ताब्यातील जागा विक्री कर असल्याचे शब्द या विक्री खतात लिहिलेले आहेत.
या संदर्भाने सत्यतेचा मागोवा घेतला असता मागील कांही वर्षापासून विष्णुपूरी गावातील ,विष्णुपूरी ग्राम पंचायत हद्दीतील अनेक गायरान जमीनी अशाच पध्दतीने बळकावल्या गेल्या आहेत असे अनेक विष्णुपूरीकरांनी सांगितले. गुंड लोकांच्या मदतीने आपल्याच नात्यातील लोकांना मारहाणीचे प्रकार विष्णुपूरीमध्ये सहज झाले आहेत. जमीनीवरील कब्जा आणि मारहाण याबाबत कोणी तक्रार घेवून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गेला तर त्याला कोणताही प्रतिसाद मिळत नाही याचे कारण लिहिण्याची आता काही गरज नाही.
