नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या जीवनात कवी असलेल्या व्यक्तीने पोलीस अंमलदार या पदावर आपली 31 वर्ष 9 महिने 10 दिवस आपली सेवा पुर्ण करून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक धोंडीबा नागोबा मोरे खैरकेकर यांची सेवा 30 ऑक्टोबर 2021 रोजी पुर्ण होत आहे. आपल्या सेवेत अनेक खडतर प्रवास करत अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चांगल्या वाईट मार्गदर्शनांना स्विकार करत त्या मार्गदर्शनातून जनतेचे भले कसे करता येईल हेच ध्येय ठेवून आपली पोलीस सेवा पुर्ण करणाऱ्या धोंडीबा नागोबा मोरे यांच्या सेवापुर्तीनिमित्त त्यांना भविष्यकालीन जीवनासाठी शुभकामना.
खैरका ता.मुखेड जि.नांदेड येथील धोंडीबा नागोबा मोरे खैरकेकर यांनी 21 जानेवारी 1990 रोजी नांदेड जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई पदावर आपला दावा सुनिश्चित केला. त्या अगोदर त्यांनी राज्य राखीव पोलीस दल सोलापूर, केंद्रीय राखीव दल नागपूर येथे निवड झाल्यानंतर सुध्दा ते त्या कामावर गेले नव्हते. कारण आपल्या जिल्ह्याची सेवा करण्याचे ध्येय धोंडीबा मोरे यांनी आपल्या मनात बाळगले होते. म्हणून त्यांनी नांदेड जिल्हा पोलीस दलाची निवड केली.
पोलीस झाल्यावर पोलीस ठाणे किनवट, माहूर, मांडवी, सिंदखेड, इस्लापूर या हद्दींमध्ये त्यावेळी सुरु असलेल्या नक्षल विरोधी मोहिमेत मोठे परिश्रम घेतले. त्यासाठी त्यांना खडतर सेवा पदक आणि कठीण सेवा पदक अशी दोन पदके प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी नांदेड शहरातील वजिराबाद, देगलूर, बिलोली, मुक्रामाबाद आणि शेवटचे पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे आपल्या सेवा देवून जनतेच्या कामांना महत्व दिले. नांदेड ग्रामीणला आज धोंडीबा नागोबा मोरे खैरकेकर हे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक या पदावर कार्यरत आहेत.
आपल्या जीवनात अपारंपारिक अभियान नागपूर येथे त्यांनी प्रगटीकरण प्रशिक्षण पुर्ण केले. आपल्या आठवणीतील प्रसंग सांगतांना धोंडीबा मोरे म्हणाले सन 2006 मध्ये देगलूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका खून प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी ते पुणे येथे गेले होते. तेथे नांदेडचे माजी पोलीस अधिक्षक संजय जाधव हे गुन्हे शाखा क्रमांक 1 चे प्रभारी अधिकारी होते. त्यांनी संग्रामसिंघ निशाणदार यांच्यासोबत त्या गुन्ह्यातील आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावर अटक केली. त्या आरोपीला घेवून आल्यानंतर त्यांनी केलेल्या आव्हानात्मक कामगिरीची प्रशंसा झाली. आपल्या जीवनावर नांदेडचे माजी पोलीस अधिक्षक व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण आणि अमिताभ गुप्ता यांचे ठसे उमटलेले आहेत आणि त्यांच्या प्रेरणेनेच मी माझ्या जीवनाची 31 वर्षाची सेवा पुर्ण करत असल्याचा आनंद व्यक्त केला.
आपल्या जीवनात झालेल्या प्रशंसेविषयी बोलतांना धोंडीबा नागोबा मोरे खैरकेकर म्हणाले 14 ऑगस्ट 1995 रोजी उदगीर शहरात झालेल्या महामानवाच्या पुतळा विटंबनेच्या दरम्यान उदभवलेल्या परिस्थितीत बंदोबस्त करतांना लिहिलेली एक कविता चेतना प्रशिक्षण सत्राच्या निरोप समारंभात मी सादर केली होती. ती कविता पोलीस अधिक्षक व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांच्या प्रेरणेने अनेकांपर्यंत पोहचली. खुर्शीदबानो महिला महाविद्यालयात परिक्षा बंदोबस्त करत असतांना परिक्षेच्या संदर्भाने लिहिलेली कविता देगलूर येथील गणपती विसर्जनातील बक्षीस वितरण समारंभात सादर केली होती. तेंव्हा पोलीस अधिक्षक अमिताभ गुप्ता आणि तत्कालीन पोलीस उपअधिक्षक संजय जाधव यांनी प्रशंसित केली होती. माझ्या जीवनातील 31 वर्षाची सेवा पुर्ण करतांना माझ्या आई-वडीलांच्या कष्टांचे फळ आणि त्यांनी दिलेले संस्कार यामुळेच मी ही सेवा अत्यंत योग्यरितीने पुर्ण केली असल्याचे धोंडीबा मोरे सांगत होते.
आपल्या सेवाकाळात धोंडीबा मोरे यांना आलेल्या अनुभवांचा भरपूर साठा त्यांनी सांगीतला आहे. पण तो साठा आम्ही शब्द केला तर त्याचा परिणाम धोंडीबा मोरे यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या कामकाजावर पडेल म्हणून आम्ही आमच्या शब्दांना आज तरी बांधून ठेवले आहे. पण धोंडीबा मोरे यांनी आपल्या सेवा काळात दिलेली सेवा नक्कीच प्रशंसनिय आहे. त्यांच्या सेवेची दखल घेणे आमचे कर्तव्य आहे. त्यांच्या भावी जीवनासाठी शुभकामना देत आम्ही पुर्ण विराम देत आहोत.
