नांदेड(प्रतिनिधी)-काल दि.26 ऑक्टोबर रोजी रात्री 8.30 वाजता सरकारी रुग्णालय विष्णुपूरी येथे कांही लोकांनी छोट्याशा कारणावरून एका पोलीसाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी याबाबत गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीसांची परिस्थिती काय? याची कल्पना येईल.
प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार काल दि.26 ऑक्टोबर रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरकारी रुग्णालय विष्णुपूरी येथे एका व्यक्तीला सरकारी रुग्णालयात कार्यरत पोलीसाने काही समज दिली. या समज देण्याच्या घटनेला समज घेणाऱ्याने चुकीच्या दृष्टीकोणातून अवलोकीत केले. त्याने मला पोलीस असे म्हणाला, माझ्या सोबत असे केले या घटनेला प्रसारीत केले. त्याने ज्या पध्दतीने ती घटना प्रसारीत केली होती. त्यानुसार त्या व्यक्तीसोबत तेथे अनेक जण जमले आणि पोलीसाला मारहाण केली. याबद्दलची माहिती नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात पोहचल्यानंतर या घटनेला अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज होती. पोलीस चुकला असेल तर त्याविरुध्द सुध्दा कायदेशीर कार्यवाही फौजदारी प्रक्रिया संहिता, पोलीस नियमावलीमध्ये लिहिलेली आहे. पण सार्वजनिक ठिकाणी पोलीसाला झालेली मारहाण ही सुध्दा अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे. पण तसे घडले नाही. या प्रकरणाला मांडवली करण्यात आली.
मांडवली झाली असली तरी मार खाणाऱ्या पोलीसावर काय बेतली असेल आणि त्याला त्याच ठिकाणी पुढे कर्तव्यपण बजवायचे आहे अशा परिस्थिती सरकारी रुग्णालयात ज्या लोकांनी ही घटना पाहिली त्या लोकांच्या मनात त्या पोलीसाबद्दल काय विचार राहतील.पुढे कधी तो कांही सांगेल तर लोक ऐकतील काय? अशा परिस्थितीत पोलीसाला झालेल्या मारहाणीच्या घटनेला गांभीर्याने का घेतले नाही यासाठी पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी एखाद्या संशोधन क्षेत्रातील व्यक्तीची नेमणूूक करून ही माहिती मिळवावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
भावसार चौकाच्या वाड्यातून पोलीस ठाणे नांदेड ग्रामीणचा कारभार चालवला जात असतांना कोणत्याही गंभीर घटनेला वरिष्ठ पोलीस अधिकारी गांभीर्याने का घेत नाहीत या विषयासाठी सुध्दा एका उच्चस्तरीय समितीची नेमणूक करावी लागेल. बातम्या छापून आल्या तर माझे काय बिघडले अशा अर्विभावात वावरणारे हे सन्माननिय अधिकारी नक्कीच सार्वजनिक ठिकाणी एखाद्या रंगमंचावर सन्मानित करण्यासारखे आहेत. याची तरी दखल पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी घ्यावी आणि त्या मारखाणाऱ्या पोलीसाला न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
