नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत पुन्हा एकदा नवीन शासन निर्णय जारी केला असून मदतीच्या रक्कमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा शासन निर्णय महसुल व वनविभागाने जारी केला आहे. त्यावर उपसचिव संजय धारुरकर यांची डिजिटल स्वाक्षरी आहे.
जून ते ऑक्टोबर 2021 दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पुर परिस्थिती उदभवली. शेती पिकांचे भरपूर नुकसान झाले. दि.13 ऑक्टोबर रोजी मंत्रीमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार शासन आदेश निर्गमित करण्यात आला आहे. यापुर्वी शासनाने 10 हजार रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांना दिले होते. वाढ करण्याचा निर्णय जाहीर करतांना दिसणाऱ्या प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार दिसत आहे.
शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयात जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार 6 हजार 800 रुपये प्रतिहेक्टर नुकसान भरपाई देण्यात यावी असे असतांना शासने त्याला दर हेक्टर 10 हजार रुपये मदत जाहीर केली आहे. शासनाने पहिलेच 10 हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याची घोषणा केली आहे. ही मर्यादा दोन हेक्टर पर्यंतच्या नुकसानीसाठीच आहे. बागायत पिकांच्या नुकसानीसाठी एसडीआरएफच्या प्रचलित दरानुसार 13 हजार 500 रुपये देणे आवश्यक आहे. दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही रक्कम 15 हजार करण्यात आली आहे. बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी एसडीआरएफच्या दराप्रमाणे 18 हजार रुपये प्रतिहेक्टर देण्यात यावे.आता शासनाने ती रक्कम 25 हजार रुपये केली आहे.
तीन वेगवेगळ्या विभागांमध्ये 3200, 1500, 7000 अशी वाढ झाली आहे. शेतकरी अगोदरच मेदाकुटीला आलेला आहे आणि त्यात शासनाने शेतकऱ्यांना ही मदत वाढ करून त्यांच्या तोंडावर पुन्हा एकदा पाणेच पुसली आहेत. हा शासन निर्णय संकेतांक क्रमांक 202110211809320219 नुसार महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
