क्राईम

कापसाच्या शेतात लपवून पिकवलेला गांजा स्थानिक गुन्हा शाखेने पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हे शाखेने रामतिर्थ आणि बिलोली पोलीसांच्या मदतीने कांगठी ता.बिलोली या गावात कापसात पेरलेली गांजाची झाडे पकडली आहेत. या गांजा झाडांचे वजन 21. 550 किलो आहे. या गाजांची किंमत 86 हजार 200 रुपये आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी देगलूर आणि बिलोली हद्दीत आपल्या पथकातील पोलीस उपनिरिक्षक आशिष बोराटे, पोलीस अंमलदार गुंडेराव कर्ले, मारोती तेलंगे, दशरथ जांभळीकर, बालाजी तेलंग, गणेश धुमाळ, पवार आणि केंद्रे यांना गस्तीवर पाठवले. गस्तीच्या दरम्यान या पोलीस पथकाला मौजे कांगठी ता.बिलोली या गावाच्या नजीक शेत गट क्रमांक 304 मध्ये कापसाच्या पिकात अंमली पदार्थ असलेल्या गांजाच्या झाडांची लागवड केलेली आहे अशी माहिती मिळाली. आपली माहिती पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्यापर्यंत पोहचती करून त्यांच्या आदेशाने या पथकाने पुढील कार्यवाही केली.
पोलीस ठाणे रामतिर्थच्या हद्दीत असलेल्या कांगठी गावात जाण्याअगोदर रामतिर्थ सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय जाधव यांची भेट घेवून पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक असलेले सर्व कागदपत्र तयार करून घेतले. त्यानंतर बिलोलीचे पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे यांना या छाप्यात राजपत्रीत अधिकारी या नात्याने उपस्थित राहण्यासाठी विनंती केली. अंमली पदार्थांवर कार्यवाही करतांना आवश्यक असलेले सर्व काम पोलीस अंमलदार बोडके, लिंबाळे, आदींनी पुर्ण केले.
राजपत्रित अधिकारी पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे यांना सोबत घेवून पोलीस पथकाने शेत गट क्रमांक 304 गाठले. या शेतात कापसाचे पिक होते आणि पिकात लपवून गांजा पेरलेला होता. तपासणी केली असता एकूण 17 गांजाची झाडे या शेतात सापडली. त्यांचे एकूण वजन 21 किलो 550 ग्रॅम आहे. या गांजाची किंमत 86 हजार 200 रुपये आहे. कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करून आशिष बोराटे यांनी रामतिर्थ पोलीस ठाण्यात अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यातील कलम 20 (अ)(ब)  नुसार व्यंकट गंगाधर नरवाडे (38) याच्याविरुध्द तक्रार दिली. या तक्रारीनुसार रामतिर्थ पोलीसांनी गुन्हा क्रमांक 231/2021 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास रामतिर्थ सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी गांजाच्या लागवडीची आपल्या खबऱ्यांद्वारे माहिती काढून गांजा पकडणाऱ्या पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *