नांदेड

​ नांदेड शहरात अकृषीक कराची होणारी वसुली हा झिझीया करच आहे

तहसीलदारांना माहित नाही नांदेडमधील कोणत्या मालमत्ता गावठाण क्षेत्रामध्ये आहेत
नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड शहरातील जवळपास सांगवीपर्यंतच्या निवासी मालमत्ता या गावठाण क्षेत्रात आहेत. तरीपण त्यांच्याकडून अकृषीक कर वसुल केला जात आहे. या प्रशासनाच्या दादागिरीला महानगरपालिकेतील जनतेचे प्रतिनिधी साथ देत आहेत आणि मनपा ही वसुली करत आहे. प्राप्त झालेल्या एका पत्रानुसार तहसीलदार नांदेड यांनी निर्गमित केलेल्या या पत्रात तलाठ्याने सांगितल्यानंतर गावठाण क्षेत्राची माहिती तहसीलदारांना झाली असा बोध होतो. यापेक्षा मोठे भारतीय लोकशाही आणि भारतीय प्रशासनिक व्यवस्था यातील दुर्देव दुसरे नसेल.
नांदेड-वाघाळा महानगरपालिका यांच्यावतीने मागील अनेक वर्षापासून शहरात असलेल्या प्रत्येक मालमत्तेवर अकृषीक कर वसुल करण्याची जबाबदारी आहे. याबद्दल ओरड झाली तेंव्हा हा कर आम्ही लावला नाही तर तो जिल्हाधिकारी कार्यालयाने लावला आहे असे सांगितले आहे. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत जनतेचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी गेलेले प्रतिनिधी असे उत्तर देतात यापेक्षा दुर्देव काय?
कांही वर्षांपुर्वी माजी मंत्री सुर्यकांता पाटील यांनी एकदा सांगितले होते की, शेतकऱ्यांची मुली असलेली आणि पुढे आयएएस, आयपीएस झालेली ही मंडळी  इंग्रजांची बाप आहे. सर्वसामान्य माणसाचा विचार करण्यासाठी तयार झालेल्या भारतीय राज्य घटनेला छेद देत ही मंडळी काम करतात. नांदेड शहरात वसुल होणारा अकृषीक कर म्हणजे हाच प्रकार आहे असे म्हणावे लागेल. सन 2007 मध्ये महसुल व वनविभागाने जारी केलेल्या एका परिपत्रकात कांही जमीनींना अकृषीक करातून वगळेलेले आहे. या परिपत्रकाला कैराची टोपली दाखवत अकृषीक कराची वसुल बिनधास्त सुरूच आहे. या संदर्भाने कोणी आक्षेप घेतलाच तर आम्हाला शासन निर्णय दाखवा, परिपत्रक दाखवा असे शासनाचे सेवक सांगतात. ज्यांनी शासनाच्या नियमावलीचा वापर सर्वसामान्य माणसासाठी करायचा आहे अशी त्यांच्यावर जबाबदारी आहे.
अशा परिस्थितीत नांदेडच्या तहसीलदारांनी दि.1 एप्रिल 2021 रोजी जारी केलेले एक पत्र बोलके आहे. यामध्ये सहाय्यक आयुक्त क्षेत्रीय कार्यालय 5-इतवारा, क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 1-सांगवी आणि क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 2 अशोकनगर यांना उद्देशून लिहिलेले हे पत्र आहे. या पत्रात 7 मालमत्ता धारकांची मालमत्ता गावठाण क्षेत्रात असल्याची माहिती तहसीलदार साहेबांना तलाठी सज्जा नांदेड शहर आणि तलाठी सज्जा सांगवी (बु) येथील तलाठ्यांनी दिली आहे. याचा अर्थ असा होतो की, जुने नांदेड ते विमानतळ हा सर्व भाग गावठाण क्षेत्राचा आहे. ही माहिती तहसीलदार साहेबांना नसावी यापेक्षा प्रशासनाचे दुर्देव काय असेल.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर गावठाण क्षेत्रात झालेली वाढ ही अभिलेखात नोंद घेणे प्रशासनाचे काम आहे. ते केलेच नाही उलट जनतेलाच वेठीला धरून त्यांच्याकडून गरज नसतांना, अधिकार नसतांना अकृषीक कर वसुल केला. आज सांगवी, इतवारा आणि अशोकनगर हे भाग गावठाण क्षेत्रात आहेत असे तहसीलदार नांदेड आपल्या पत्रात लिहितात याचा अर्थ जवळपास नांदेड शहर पुर्णपणे गावठाण क्षेत्रात आहे. तरीपण या क्षेत्रात मालमत्ता धारकांकडून बेकायदेशीर अकृषीक वसुली कोणी थांबवली नाही. तहसीलदारांनी लिहिलेल्या पत्रात फक्त 7 मालमत्ता धारकांचा अकृषीक कर कमी करावा असे लिहिलेला आहे. म्हणजे प्रत्येक नागरीकाने आपल्या मालमत्तेचा अकृषीक कर कमी करण्यासाठी पत्र द्यायचे काय. तहसील कार्यालय नांदेडच्या नागरीकांची करत असलेली ही लुट आणि त्याबद्दल कोणीही समाजसेवक, नेता कांही बोलत नाही यापेक्षा जगात प्रगल्भ असलेल्या भारतीय लोकशाहीचे दुर्देव दुसरे काय असणार.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *