नांदेड

मी कॉंग्रेसमध्ये आलो म्हणजे देगलूर-बिलोली मतदार संघात जितेश अंतापूरकर यांचा विजयचं

नांदेड (प्रतिनिधी)- मी कॉंग्रेस पक्षात सामील झालो तर जितेश अंतापूरकर निवडून आल्याचे आजच जाहीर करतो, असे सांगत भाजपचे भास्करराव पाटील खतगावकर यांनी मी भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी दिल्याचे जाहीर केले.
आज बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत भास्करराव पाटील खतगावकर यांनी ही घोषणा केली. यावेळी ओमप्रकाश पोकर्णा, सरजितसिंघ गील, रवी पाटील खतगावकर, बाबाराव पाटील भाले, राजू गंदीगुडे, आनंदराव पाटील बिराजदार, दीपक पावडेे यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षाला राम राम केल्याचे सांगितले. याप्रसंगी भारतीय जनता पक्षात जाऊन आमची चूक झाली, आम्ही चुकलेले वाटसरू आहोत अशी शब्दांत ओमप्रकाश पोकर्णा यांनी आपले मत व्यक्त केले.
पत्रकार परिषदेत जास्त न बोलता भास्करराव पाटील खतगावकर यांनी एक निवेदन पत्रकारांना दिले, त्या निवेदनानुसार शिस्तीचा पक्ष म्हणून ओळखला जाणारा भारतीय जनता पक्ष नांदेडमध्ये खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्यामुळे बेशिस्तीचा कळस गाठत आहे. पुर्ण भारतीय जनता पक्ष खा. चिखलीकरांच्या दावणीला बांधून गेला आहे. शिवसेनेतून आयात केलेल्या सुभाष साबणे यांना उमेदवारी देण्यात आली.  आपण केलेलेच खरे खा. चिखलीकर सांगतात आणि पराभव झाला तर त्याचे खापर माझ्यावर फोडतात असे कारस्थान मला स्पष्टपणे दिसून आले.
या पार्श्वभुमीवर माझ्यासोबत काम करणाऱ्या गावातील मंडळींशी चर्चा केली तेव्हा माझे कार्यक्षेत्र राहिलेल्या देगलूर-बिलोली विधानसभा मतदार संघातील मंडळींनी मला भारतीय जनता पार्टी चिखलीकरांची वैयक्तीक मालमत्ता झाली आहे, आता दुसरा पर्याय शोधा असे सांगितल्याने मी भारतीय जनता पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आणि आजच कॉंग्रेस पक्षात माझ्या सहकार्यांसोबत प्रवेश केला आहे, असे भास्कराव पाटील खतगावकर यांनी सांगितले.
मी आज कॉंग्रेसमध्ये आलो आहे, आणि आजच मी हे जाहीर करत आहे की, मी माझी ताकद कॉंग्रेसला दिल्यामुळे जितेश अंतापूरकर निवडूनच आले आहेत. भविष्यात मी कोणतीही निवडणूक लढविणार नाही हे मी मागेच जाहीर केले होते हे मी आजही सांगत आहे. भारतीय जनता पार्टीत वाट चुकली होती, हेही भास्करराव पाटील खतगावकर म्हणाले.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *