नांदेड(प्रतिनिधी)-12 ऑक्टोबर रोजी विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गायब झालेल्या एका अल्पवीयन मुलाबद्दल भारतीय दंड संहितेच्या कलम 363 नुसार गुन्हा दाखल झाला. हा मुलगा एका जागरुक नागरीकाच्या चाणाक्ष नजरेने ओळखला आणि सुदैवाने तो परत घरी आला.या सह प्रवाशाचे नाव इब्राहिम खान मुस्तफा खान आहे.
दि.12 ऑक्टोबर रोजी माझा अल्पवयीन मुलगा(वय 13) पळवून नेल्याची तक्रार गोविंद भगवानराव तोरणे या पित्याने दिल्यानंतर विमानतळ पोलीसांनी गुन्हा क्रमांक 311/2021 दाखल केला. कोणी तरी अज्ञात माणसाने अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याच्या सदरात हा गुन्हा दाखल झाला.या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक एकनाथ देवके यांच्याकडे देण्यात आला. विमानतळचे पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार या बालकाला कोणी पळवले नव्हते. हा आपल्या घरून न सांगता गेला होता. सध्या तो आई-वडीलांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
14 ऑक्टोबर रोजी रेल्वे पोलीस परभणीकडून आलेल्या माहितीनुसार एक अल्पवयीन बालक त्यांच्या ताब्यात आहे. तो विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहणारा आहे. पोलीस उपनिरिक्षक एकनाथ देवके हे परभणी येथे गेले आणि या बालकाला घेवून परत आले त्यानंतर समोर आलेल्या या घटनेतील खरा प्रकार असा आहे की, दि.12 ऑक्टोबर रोजी या अल्पवयीन बालकाने त्याच्या पेक्षा लहान भावासोबत घरात भांडण केले. आता या भांडणाची चाहुल बापाला लागली तर बाप आपली सेवा करेल या भितीने तो घरातून बाहेर आला. तो पायी चालत रेल्वे स्थानकात पोहचला. त्यावेळी रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या गाडीत बसला आणि ही गाडी रात्रीचा प्रवास करून 13 तारखेला हैद्राबाद येथे पोहचली. हैद्राबादला पोहचल्यावर ही मुंबई नाही असे त्या बालकाला कळले कारण त्याने मुंबई ऐकलेले होते.
पुन्हा 13 ऑक्टोबरला हा बालक मुंबईला जाणाऱ्या देवगिरी एक्सप्रेसमध्ये बसला आणि त्याचा दुसरा प्रवास सुरू झाला. या कालखंडात या गाडीतील नांदेड येथील श्रावस्तीनगर येथे राहणारा प्रवासी होता. या बालकाला एकटे पाहुन त्याला संशय आला. त्याने त्या बालकाची विचारणा केली तेंव्हा तो आपले स्वत:चे नाव खोटे सांगत होता. सहकारी प्रवाशाला सुदैवाने असे वाटले की, या बालकाची मदत करायला हवी. त्या गाडीतून तो परभणी येथे जाणार होता. परभणी येथे त्याच्या नातलगाच्या घरी एका कार्यक्रमात सहभागी व्हायचे होते. तेथे तो पोहचल्यावर बालक आपल्या नजेरतून निसटून जावू नये याची दक्षता त्या व्यक्तीने घेतली. पण असे घडलेच तर हा विचार त्याच्या मनात आला तेंव्हा त्याने बालकाला रेल्वे पोलीस परभणी यांच्या ताब्यात दिले. दरम्यान अल्पवयीन बालकाच्या वडीलांचा नंबर मात्र त्या बालकाने स्वत: सांगितला होता. माहिती मिळताच पोलीस उपनिरिक्षक एकनाथ देवके परभणी येथे गेले आणि त्या बालकाला घेवून परत आले. एकूणच बालकाच्या स्वत:च्या विचाराने, मनातील भितीने घडलेला प्रकार एका गुन्ह्यात बदलला होता. पण त्या सहप्रवाशाने घेतलेली त्या बालकाची दक्षता खुप महत्वपूर्ण आहे. ज्यामुळे या बालकासोबत कांही वाईट होण्याअगोदर तो पुन्हा आपल्या आई-वडीलांच्या सुरक्षेत पोहचला.
जगात प्रत्येक घटनेवर वेगवेगळ्या चर्चा होतात या चर्चांचा परिणाम कधी वाईट निघतो पण कधी त्या चर्चांमधून मोठा उद्देश साध्य होतो. या प्रकरणातील इब्राहिम खानने केलेली कामगिरी आणि त्याचे परिश्रम आम्ही लेखणीतून लिहिले नाही तर आमचे नाव सुध्दा बोरुबहाद्दरांमध्ये जाईल. जाती-पातीचा विचार न करता इब्राहिम खानने एका अल्पवयीन बालकासाठी घेतलेली मेहनत त्याचा सन्मान करण्यासारखी आहे. प्रत्येक व्यक्तीने इब्राहिम खानसारखा विचार केला तर आपसात कधीच वैर येण्याची शक्यता राहणार नाही. उगीचच तो आमचा, मी त्यांचा नव्हे या विचारांना आता तरी आपल्या जीवनातून काढून टाकण्याची गरज आहे.
