नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडचे पत्रकार भवन न उभारता फसवणूक करणाऱ्या पत्रकार संघटना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी असे एक पत्र ज्येष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी यांनी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री अशोक चव्हाण यांना लिहिले आहे. हे पत्र व्हॉटसऍप या संकेतस्थळावर व्हायरल झालेले आहे.
अशोक चव्हाण यांना उद्देशून लिहिलेल्या या पत्रामध्ये अनिकेत कुलकर्णी लिहितात नांदेड येथील पत्रकार भवनाचा प्रश्न गेल्या 20 ते 25 वर्षांपासून प्रलंबित आहे. नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ, बहुभाषिक पत्रकार संघ यांना महाराष्ट्र राज्याच्या तीन मुख्यमंत्र्यांनी लाखो रुपयांच्या देणग्या दिलेल्या आहेत. तरी अद्यापपर्यंत पत्रकार भवन उभारण्यात आलेले नाही. आपण स्वत: मुख्यमंत्री असतांना दोन पत्रकार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र आणून पत्रप्रबोधीनी नावाची नवीन विश्र्वस्त संस्था स्थापन केली होती. त्या नवीन विश्र्वस्त संस्थेस आपण सिडको भागात 10 हजार चौरस फुटाची जागा पत्रकार भवन उभारण्यासाठी उपलब्ध करून दिली होती. अशी माहिती मला आहे. तरीपण या घटनेला 10 वर्ष उलटली आहेत. नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ, बहुभाषिक पत्रकार संघ आणि पत्रप्रबोधीनी या तिन्ही संस्था किंवा त्यांचे पदाधिकारी पत्रकार भवनाचे काय झाले, अनेक मुख्यमंत्र्यांनी दिलेला लाखोंचा निधी काय झाला याबद्दल काही बोलण्यास अथवा सांगण्यास तयार नाहीत. यावरून पत्रकार भवन प्रश्नी कांही तरी गैर व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आपण अर्थात अशोक चव्हाण यांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेवून सक्षम अधिकाऱ्यामार्फत चौकशी करावी व दोषींवर कठोर कार्यवाही करावी अशी विनंती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांना ज्येष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी यांनी केली आहे.
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानल्या गेलेल्या पत्रकारांना आणि त्यांच्या संघटनांना भारतात खुप मोठे महत्व आहे. तीन माजी मुख्यमंत्र्यांनी दिलेला निधी विश्र्वस्त व्यक्ती म्हणून ज्या कोणी माणसाने बॅंकेत ठेवला असेल तर ती रक्कम आता पाच ते सात पटीने वाढायला हवी. असे झाले असेल तर माझ्याकडे निधी एवढ्या आकड्यात जमा झाला आहे, मिळाला ऐवढा होता, बॅंकेत ठेवल्यामुळे मिळालेले व्याज असा एकूण आकडा सांगण्यास कांही एक हरकत नसावी तरीपण कोणी ते सांगत नाही यावरून अनिकेत कुलकर्णी यांची शंका खरी वाटते. आमच्या माहितीनुसार तर माजी तीन मुख्यमंत्र्यांनी दिलेला निधी हा कोणाच्या तरी व्यक्तीगत नावावर होता त्याचा विश्र्वस्त संस्थेशी कांही एक संबंध नाही असे संबंधीत पत्रकार विश्र्वस्त खाजगीत सांगतात.
यापुर्वी महानगरपालिकेने सुध्दा विमानतळालगत असलेली एक जागा पत्रकारांच्या गृहसंकुलांसाठी दिली होती. त्यातही कांही जणांनी आपल्या नावे नोंदणी खताद्वारे त्या जागा लावून घेतल्या आहेत अशी माहिती आहे. महानगरपालिकेने तरी याबाबत चौकशी करावी. ज्या कामासाठी ती जागा दिली होती. त्या जागेचा वापर तोच होत आहे काय नसता ती सुध्दा परत घ्यावी. नांदेड महानगरपालिकेत कॉंग्रेसचेच राज्य आहे. अर्थात अशोक चव्हाण याबाबतही माहिती गोळा करू शकतात.
सध्या तर अंतर राष्ट्रीय पत्रकारांचा बोभाटा सुरू झाला आहे. त्यांना तर कांही सांगणे आणि कांही विचारणे हे सुध्दा खुप अवघड झाले आहे. जिल्ह्यात एखाद्या गावाला जातांना ज्याने बोलावले त्याला चार चाकी वाहनाचा खर्च लावून बातम्या लिहिल्या जातात, पाकीटांची संख्या तर मोजणे अवघड आहे या शिवाय सुध्दा प्रशासनिक अधिकाऱ्यांकडून बरेच कांही उकळण्याचा नवीन धंदा सुरू झाला आहे. तेंव्हा आपलीच इभ्रत वेशीला टांगणाऱ्या पत्रकारांना सलाम करण्या पलिकडे दुसरा कांही एक पर्याय सध्या तरी शिल्लक दिसत नाही.
