क्राईम

चार वेगवेगळ्या चोऱ्यांमध्ये 2 लाख 29 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-बालाजीनगर, हिंगोली नाका येथे मध्यरात्रीनंतर कांही जणांनी एका घराचा दरवाजा ठोठावून दार उघडायला लावले आणि खंजीरच्या धाकावर महिलेच्या गळ्यातील गंठण आणि अंगठी असा 95 हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे.
हणमंतराव पिराजी जमदाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीनंतर 1.45 वाजता त्यांच्या बालाजीनगर, हिंगोली नाका येथील घराचे दार कोणी तरी थोटावले. दार उघडल्यावर आमचे पेट्रोल संपले आहे. आम्हाला थोडे पेट्रोल द्या असे दार वाजवणाऱ्यांनी सांगितले. ते तिघे जण होते. त्यानंतर तिघांनी त्यांना घरात ढकलून त्यांना व त्यांच्या मुलाला खंजीरच्या उलट्या बाजूने मारुन आणि पत्नीला धक्का देवून त्यांच्या गळ्यातील गंठण व सोन्याची अंगठी असा 95 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक बी.आर.गिते अधिक तपास करीत आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गावठी पिस्टलचा धाक दाखवून मोहम्मद हमीद, मोहम्मद गणी मुळ रा.राजस्थान ह.मु.सरकारी रुग्णालयाच्या विद्यार्थी वस्तीगृहात विष्णुपूरी यांना 9 ऑक्टोबर रोजी रात्री 11.50 वाजेच्यासुमारास ते वस्तीगृहा बाहेर असतांना दोन जण मोटारसायकलवर आले आणि त्यांना पिस्टलसारख्या हत्याराचा धाक दाखवून त्यांच्याकडील 10 हजार 500 रुपये किंमतीचा मोबाईल बळजबरीने चोरून नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक कोरे अधिक तपास करीत आहेत.
शेख फरीद शेख हुसेन रा.गोकुंदा किनवट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते आणि त्यांचे भाऊ आपल्या घराला कुलूप लावून पुतण्याच्या साखरपुडा कार्यक्रमात गेले होते. 10 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजता परत आले तेंव्हा त्यांच्या घराचे कुलूप तोडलेले होते आणि त्यांच्या घ रातून 50 हजार रुपये रोख रक्कम आणि भावाच्या घरातून 20 हजार रुपये असे 70 हजार रुपये चोरून नेले आहेत. किनवट पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार राठोड अधिक तपास करीत आहेत.
श्रीकांत सुरेशराव दरबस्तवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 3 ऑक्टोबर रोजी त्यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.झेड.0079ही 54 हजार रुपये किंमतीची गाडी भोकर-किनवट रस्त्यावरून घिसेवाड यांच्या शाळेजवळ चोरीला गेली आहे. भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार संजय पांढरे अधिक तपास करीत आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *