नांदेड(प्रतिनिधी)-सहा वर्षापासून आपल्यावर होणारा अन्याय सहन करणाऱ्या महिलेने नवरात्रोत्सवात त्याला वाचा फोडली. या प्रकरणातील आरोपी पुजाऱ्याने पिडीत महिलेच्या मुलीवर सुध्दा अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. सध्या देविचा पुजारी असलेला हा अत्याचारी गुन्हेगार पोलीस कोठडीत आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका देवी मंदिराचा पुजारी असलेला श्रीपाद दिवाकरराव कुलकर्णी याने सन 2015 मध्ये मंदिरा शेजारी घर असलेल्या एका विवाहितेचे काही आक्षेपार्ह फोटो काढले. या फोटोंना व्हायरल करील असे सांगत तो सतत तिच्यावर अत्याचार करत राहिला. 40 वर्षीय महिला हा अत्याचार सहन करत राहिली. पुढे पुजाऱ्याची नियत आणखीन खालावली आणि त्याने त्या पिडीतेच्या मुलीवर आपला डोळा वळवला. हा नराधम पुजारी मला देवानेच तुझ्यासाठी पाठवले असल्याची बतावणी करत मी तुझा आणि मुलांचा सांभाळ करील अशी खोटी वचने दिला देत होता. याबाबत 6 वर्षानंतर नवरात्रोत्सवात पिडीतेचे डोळे उघडले आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे गाठले.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा भारतीय दंड संहितेच्या कलम 376 नुसार दाखल केला आहे. या गुन्हयाचा तपास पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक विश्र्वजित कासले आणि पोलीस अंमलदार शंकर बिरमवार यांच्याकडे देण्यात आला. पोलीसांनी त्वरीत प्रभावाने श्रीपाद दिवाकरराव कुलकर्णीला अटक केली. काल दि.10 ऑक्टोबर रोजी न्यायालयाने देवाचे नाव घेवून महिलेवर अत्याचार करणाऱ्या बोगस पुजाऱ्याला तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.