नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर-बिलोली या 90 क्रमांकाच्या विधानसभा पोट निवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी 23 उमेदवारांनी 34 नामांकन अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारीच्या रिंगणात शेवटी किती जण राहतील यासाठी कांही काळ वाट पाहावी लागेल.
90-देगलूर-बिलोली विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणुकीमध्ये आज च्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 23 उमेदवारांचे एकूण 34 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी सचिन गिरी यांनी दिली आहे. प्रत्येक राजकीय पक्षामध्ये ही पोट निवडणुक जिंकण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
या निवडणुकीच्या दरम्यान 5 ऑक्टोबर रोजी नामांकन अर्ज दाखल करण्याची सुरूवात झाली. 8 ऑक्टोबर हा नामांकनासाठीचा शेवटचा दिवस होता. त्यादिवशी एकूण 23 उमेदवारांचे एकूण 34 अर्ज प्राप्त झाले. अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये कॉंगेस पक्षाच्यावतीने रितेश रावसाहेब अंतापूरकर, शितल रावसाहेब अंतापूकर, भाजपाच्यावतीने सुभाष पिराजीराव साबणे, विक्रम सुभाषराव साबणे, वंचित बहुजन आघाडीचे उत्तम रावराव इंगोले, जनता दलाचे विवेक पुंडलिकराव केरुरकर, बाबासाहेब आंबेडकर नॅशनल कॉंग्रेसकडून प्रल्हाद जळबा हटकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोब्रागडे गटाचे दिगंबर धोंडीबा वाघमारे, बहुजन भारत पार्टीकडून परमेश्र्वर शिवदास वाघमारे. यांच्यासह 12 अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
उमेदवारी भरतांना भरपूर अर्ज आले असले तरी शेवटी निवडणुक रिंगणात कोण-कोण राहते हे पाहण्यासाठी कांही काळ वाट पाहावी लागेल. देगलूर-बिलोली विधानसभा मतदार संघात पोट निवडणुक आली. या काळात राजकीय पक्षांच्या वरिष्ठ मंडळींना जास्त काम नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष या पोट निवडणुकीला जिंकण्यासाठी आहे.