नांदेड(प्रतिनिधी)-मुद्रांक विक्रेते कसा बनावट पणा करतात आणि त्यातून मोठी रक्कम कमवतात असा एक प्रकार सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिलेल्या एका निर्णयानंतर समोर आला आहे. सन 2003 चे मुद्रांक सन 2019 मध्ये विक्री करणाऱ्या मुद्रांक विक्रेत्याचा परवाना रद्द करण्याचे आदेश वि.प्र.बोराळकर यांनी दिले आहेत.
कोंडलापूर ता.बिलोली येथील लताबाई संभाजी जाधव यांनी एक अर्ज अनेक ठिकाणी दिला. त्या अर्जानुसार त्यांचा भाऊ सुभाष बाबाराव बेलकर आणि इतर 11 जण ज्यामध्ये दोन वकील सुध्दा आहेत. सोबतच एक मुद्रांक विक्रेता आहे. या सर्वांनी मिळून 500 रुपयांचे दोन बनावट मुद्रांक आणि 20 रुपयांचे चार बनावट मुद्रांक खरेदी केले. या खरेदीतील सत्यता अशी आहे की, विक्री करण्यात आलेले मुद्रांक सन 2003 चे आहेत आणि त्यांची विक्री सन 2019 मध्ये करण्यात आली आहे. या मुद्रांक विक्रेत्याचे नाव हणमंत गोपीनाथराव कवटीकर असे आहे. त्यांचा परवाना क्रमांक 301042 असा आहे. सह दुय्यम निबंधक वर्ग-2 कार्यालय परिसरात त्यांना मुद्रांक विक्रीचा अधिकार आहे.
लताबाई संभाजी जाधव आणि त्यांचा भाऊ सुभाष बाबाराव बेलकर यांच्यातील जमीनीच्या वादाबद्दल अनेक दिवाणी खटले सुरू आहेत. साध्या भाषेत बहिणीला दिलेली जमीन खोट्या मुद्रांक कागदांच्या आधारावर माझीच आहे असा दाखविण्याचा भावाने केलेला प्रयत्न या प्रकरणात मोठा आहे. या प्रयत्नाला साथ मुद्रांक विक्रेत्याची आहे. मुद्रांक विक्रेत्याकडून 500 रुपयांचे दोन मुद्रांक क्रमांक ए.ई.340637 आणि ए.ई.340638 खरेदी करण्यात आले. हे मुद्रांक लताबाई संभाजी जाधव यांच्या नावे खरेदी केले. हा प्रकार 31 ऑगस्ट 2018 रोजीचा आहे. तसेच 20 रुपये किंमतीचे 4 मुद्रांक खरेदी केले. त्यावर 7 ऑक्टोबर 2003 आणि त्यातील एका मुद्रांकावर 8 ऑक्टोबर 2003 अशी तारीख लिहिलेली आहे. तारखा आणि स्वाक्षरी यामध्ये घोळ करून बहिणीची जमीन हडप करण्याचा हा प्रकार आहे.
याबाबत ऍड. अविनाश निलंगेकर यांनी लताबाई संभाजी जाधव यांच्यावतीने अर्ज देवून मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडे चौकशीची मागणी केली. या चौकशीमध्ये मुद्रांक विक्री रजिस्टर, त्यावर असलेल्या स्वाक्षऱ्या यातील फरक मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्या समक्ष मांडला. झालेल्या युक्तीवादाला अनुसरून मुद्रांक जिल्हाधिकारी वि.प्र.बोराळकर यांनी मुद्रांक विक्रेता हणमंत गोपीनाथराव कवटीवार याचा परवाना क्रमांक 301042 रद्द केला आहे. तसेच त्यांच्याकडे असेला सर्व मुद्रांक साठा, मुद्रांक विक्रीच्या नोंद वह्या आणि मुद्रांक साठा वही इत्यादी अभिलेख सह दुय्यम निबंधक कार्यालयात जमा करण्यास सांगितले आहे.
या आदेशामुळे लताबाई संभाजी जाधव आणि सुभाष बाबाराव बेलकर यांच्यामध्ये सुरू असलेले जमीनी संदर्भाचे दिवाणी वाद आता वेगळ्याच वळणावर जाणार आहे. आपल्याच बहिणीला फसवूण तिने मला जमीनीचा ताबा अगोदरच दिला हे दाखविण्यासाठी मुद्रांकाचा हा खेळ झाला आहे.
जुने मुद्रांक अत्यंत मोठ्या किंमतीत विक्री केले जाता आणि त्यांचा दुरुपयोग होतो हा प्रकार कांही नवीन नाही. या प्रकरणात तर जुन्या मुद्रांकासाठी 6 आकडी रक्कम देवून तो खरेदी करण्यात आला होता अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. शासनाने सुध्दा मुद्रांक विक्रेत्यांकडे असलेली जबाबदारी आणि त्यावर वचक राहण्यासाठी एक सुकर ऑनलाईन पध्दती करण्याची गरज आहे. मुद्रांक खरेदी करण्यासाठी आलेल्या माणसाचे ओळखपत्र, त्याची मुळ स्वाक्षरी तपासण्यात यायला हवी जेणे करून असे बनवा बनवीचे प्रकार घडणार नाहीत.
