नांदेड(प्रतिनिधी)-5 ऑक्टोबरच्या रात्री नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडेखोरांनी 2 बार लुटले आहेत. यामधुन जवळपास 45 हजारांचा ऐवज लुटण्यात आला आहे. त्यातील 3 जणांना शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाने आपल्या ताब्यात घेतले आहे. चार जण फरार आहेत. पकडलेल्या आरोपींकडून 6 लाख 86 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही माहिती पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत वळण रस्त्यावर दुर्गेश बिअर बार आहे. या ठिकाणी 4 ते 5 दरोडेखोरांनी मिळून बंदुकीचा धाक दाखवून लुट केली. त्यामध्ये 15 हजार रुपये रोख रक्कम 9 हजार रुपये किंमतीचे तीन मोबाईल, 300 रुपये किंमतीच्या दोन दारुच्या बाटल्या, 180 रुपयांचे दोन सिगरेट पाकीट आणि मटन लुटून नेले होते. लुटलेल्या सर्व ऐवजाची किंमत 24 हजार 480 रुपये आहे. याबाबत अरुण अशोक राखेवार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या एका घटनेत शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसंतनगर भागात असलेल्या रुपा गेस्टहॉऊसमध्ये सुध्दा चोरट्यांनी लुट केली. तेथून 18 हजार रुपये रोख रक्कम आणि इतर साहित्य बळजबरीने चोरून नेले. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे यांच्याकडे देण्यात आला आहे.
शिवाजीनगर गुन्हे शोध पथकातील प्रमुख रवि वाहुळे, पोलीस अंमलदार मधुकर आवातिरक, रवि बामणे, दिलीप राठोड, शेख लियाकत, काकासाहेब जगताप, राजकुमार डोंगरे आणि संजय मुंढे यांनी त्वरीत हालचाल करून या प्रकरणात दमेमसिंग उर्फ पाजी जोगेंद्रसिंग चव्हाण, रा.चिखली बुलढाणा यांच्यासह दोन विधीसंघर्षग्रस्त बालक शिवाजीनगर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. सोबतच अनिल पंजाबी उर्फ सुरेश पवार, रा.चिखली जि.बुलढाणा याच्यासह चार जण फरार आहेत. अशी माहिती प्रमोदकुमार शेवाळे यांनी दिली आहे. याप्रकरणातील चार जण फरार असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याकडून 20 मोबाईल, दोन गावठी पिस्तुल, एक जीवंत काडतुस, तीन दुचाकी गाड्या, एक कार आणि तीन खंजीर पकडले आहेत. या सर्व मुद्देमालाची किंमत 6 लाख 86 हजार 400 रुपये आहे. शिवाजीनगर पोलीसांनी अत्यंत त्वरीत प्रभावाने केलेल्या या कार्यवाहीसाठी पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे, शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक आनंदा नरुटे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी कौतुक केले आहे.