महाराष्ट्र

यंदाच्या नवरात्र महोत्सवात दांडीया गरबा नाही ; शासनाने जारी केल्या सुचना 

नांदेड(प्रतिनिधी)-सार्वजनिक नवरात्र महोत्सव साजरा करण्यासंदर्भाने महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने एक परिपत्रक जारी केले आहे. कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार नवरात्र महोत्सव साजरा करण्यात यावा असे या परिपत्रकात म्हटले आहे. यंदा गरबा दांडीया नाही. 
                   दि.7 ऑक्टोबरपासून नवरात्र महोत्सव सुरू होत आहे. नवरात्र महोत्सवाची समाप्त 15 ऑक्टोबर रोजी दसरा या सणाच्या  दिवशी होईल. या दरम्यान मंडळांनी 4 फुट उंचीची आणि घरगुती लोकांनी 2 फुटाची उंच अशी दुर्गामुर्ती घ्यावी. सोबतच त्याऐवजी घरातील धातुची, संगमरवरची मुर्ती घेवून तिचे पुजन करावे. सोबतच शाडु किंवा पर्यावरण पुरक मुर्तीचे पुजन करावे. मुर्ती घरच्या घरी विसर्जित करावी. घरच्या घरी विसर्जन अशक्य असेल तर कृत्रीम विसर्जनस्थळी विसर्जन करावे. यासाठी स्थानिक प्रशासनाशी समन्वय राखावा. अत्यंत साध्या पध्दतीत हा महोत्सव साजरा व्हावा. 
                       नवरात्र महोत्सवात वर्गणी, देणगी स्विकारतांना ती स्वेच्छेने दिल्यास स्विकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही याची दक्षता घ्यावी. सोबतच सामाजिक संदेश, आरोग्य विषयक संदेश जाहिरातीच्या माध्यमाने देण्यासाठी प्रयत्न करावेत. माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेबद्दल जनजागृती करावी. गरबा, दांडीया आणि इतर सांस्कृतीक कार्यक्रम आयोजित करू नये त्या ऐवजी आरोग्य विषयक शिबिरे, इतर उपक्रमे उदाहरणार्थ रक्तदान शिबिर आयोजित करावे. कोरोना, मलेरिया, डेंग्यू या आजारांबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करावी. देवी दर्शनाची सुविधा ऑनलाईन केबल नेटवर्कच्या माध्यमाने करावी. देवी मंडपात कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन व्हावे. आरती, भजन, किर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही. तसेच ध्वनी प्रदुषण संदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करावे. देवी पुजन मंडपात पाच पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. मंडपामध्ये खाद्य पदार्थ आणि पेयपानाची व्यवस्था करण्यास सक्त मनाई आहे. 
                        देवी आगमन आणि विसर्जन याबाबत मिरवणूका काढता येणार नाहीत. विसर्जनाच्या पारंपारीक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करावी. विसर्जन स्थळी लहान बालके आणि वयोवृध्द व्यक्ती यांना घेवून जाऊ नये. दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाचा कार्यक्रम प्रेक्षकां शिवाय करावा. कमीत कमी व्यक्ती रावण दहनाच्यास्थळी हजर राहतील अशी सोय करावी. रावण दहनाचा कार्यक्रम थेट प्रेक्षपणाद्वारे प्रसारीत करावा. कोविड विषाणु प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुर्नवसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग, महापालिका, पोलीस आणि स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी काढलेल्या सुचना बंधनकारक आहेत. या परिपत्रकावर महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाचे उपसचिव संजय खेडेकर यांची डिजिटल स्वाक्षरी आहे. हे परिपत्रक शासनाने सांकेतांक क्रमांक 202110041330365829 नुसार शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *