क्राईम

सिमेंट दुकानात 7 लाख 70 हजारांची लुट करणारा मुख्य आरोपी शिवाजीनगर पोलीसांनी पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-11 ऑगस्ट रोजी गोकुळनगर भागातून एका सिमेंट व्यापाऱ्याचे 7 लाख रुपये शस्त्राच्या धाकावर लुटून नेणाऱ्या मुख्य आरोपीला शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाचे प्रमुख रवि वाहुळे यांनी पुणे येथून पकडून आणले आहे.
दि.11 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7.30 वाजता गोकुळनगर येथील बालाजी ट्रेडर्स ही दुकान बंद करून जमा झालेले 7 लाख 70 हजार रुपये एका सुटकेसमध्ये ठेवून दुकानातील कामगार घरी जाण्याच्या तयारीत असतांना एका गॅंगने पिस्तुल आणि तलवारींचा धाक दाखवून ही 7 लाख 70 हजारांची बॅग लुटून नेली होती.
या प्रकरणी पोलीसांनी अगोदर दुकानातील एका नोकराला अटक केली होती. त्याच्या मोबाईलवरून लुट करणाऱ्यांना संदेश पाठवल्याचा पुरावा हस्तगत झाला होता. त्यानंतर आणखी दोघांना पकडण्यात आले. पण मुख्य लुटारू सापडला नव्हता.
शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक आनंदा नरुटे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पोलीस अंमलदार शिलराज ढवळे, रवि बामणे, विशाल अटकोरे यांच्या पथकाने मुख्य लुटारू मारोती हरी सरोदे (23) याचा माग काढला. तो पुण्यात आहे अशी माहिती मिळाल्यानंतर शिवाजीनगर पोलीसांच्या पथकाने त्या मारोती हरी सरोदेला पुणे येथून पकडून आणले आहे. मोठ्या दरोड्यातील मुख्य आरोपीला पकडणाऱ्या शिवाजीनगर पोलीस पथकाचे पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी कौतुक केले आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *