महाराष्ट्र

पोलीस महासंचालकांच्या पुढाकाराने अधिकारी बदल्यांमधील अडचणी संपणार

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि पोलीस उपनिरिक्षक यांच्या बदल्यांसाठी पोलीस विभागाच्या शासकीय संकेतस्थळावर एक पध्दत तयार केली आहे. या पध्दतीनुसार प्रत्येकाला आपली अडचण पोलीस महासंचालकांसमोर मांडता येईल. सोबतच आपल्या विनंतीची आजची परिस्थिती काय आहे हे सुध्दा पाहता येईल.
पोलीस महासंचालक संजय पांडे आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीसाठी अत्यंत बारकाईने लक्ष ठेवतात याची अनेक उदाहरणे आजपर्यंत समोर आली आहेत. त्यात संजय पांडे यांनी नव्याने शासनाच्या पोलीस संकेतस्थळावर एक वेगळा विभाग तयार केला असून त्याचे नाव ग्रीव्हीएनसेस असे आहे. पोलीसांच्या संकेतस्थळावर या लिंकच्या माध्यमाने पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि पोलीस उपनिरिक्षक आपल्या अडचणी थेट पोलीस महासंचालकांसमक्ष मांडू शकतील. त्यामुळे त्यांच्या कामांसाठी येणाऱ्या अडचणी कमी होतील.
पोलीस निरिक्षक ते पोलीस उपनिरिक्षक या तीन पदांच्या अधिकाऱ्यांनी या लिंकमध्ये लॉगईन करून आपले प्रोफाईल तयार करायचे आहे. प्रोफाईल तयार झाल्यावर विनंती, सेवानिवृत्ती, अडचणी, बदली, पती-पत्नी एकत्रीकरण, विविध अर्ज या बद्दल आपली विनंती करता येईल. सर्वात महत्वाचा प्रकार बदलीचा आहे. या संकेतस्थळावरद्वारे एखाद्या अधिकाऱ्याने त्यात आपल्या बदलीचा विषय टाकला तर त्याला राज्यभरातील कोणत्या पोलीस घटकामध्ये त्यांच्या पदाच्या किती जागा रिक्त आहेत हे दिसेल. यापुढे ते आपली विनंती करू शकतील आणि त्यासाठी पाठबळ देणारे कागदपत्र त्याच संकेतस्थळावर जोडण्याची सोय आहे. कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर ती अडचण मांडल्यानंतर त्यांना एक तिकिट नंबर मिळेल. या तिकिट नंबरच्या आधारे पोलीस अधिकारी आपल्या अर्जाची, विनंतीची आजची परिस्थिती काय आहे हे नंतर सुध्दा पाहु शकतील.
पोलीस महासंचालकांनी तयार केलेल्या या संकेतस्थळामुळे बदलीसाठीची सर्वात मोठी अडचण संपून जाणार आहे. सर्वकाही पारदर्शक असेल ज्या ठिकाणी जागा उपलब्ध असेल त्या ठिकाणी बदली मिळेल आणि पोलीस अधिकारी आपल्या पसंतीची जागा मिळाल्यामुळे जास्त कर्मठपणे आपले काम करतील. पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या अनेक बदलांसाठी त्यांचे नाव पोलीस खात्यातील अधिकारी व अंमलदार लवकर विसरणार नाहीत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *