

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या वडीलांसोबत दुचाकीवर जाणाऱ्या एका 29 वर्षीय युवकाला खडकपूरा भागातून दुपारी 3 जणांनी पळवून नेल्याचा प्रकार घडला. पोलीसांनी त्वरीत राबवलेल्या शोध मोहिमेनुसार त्यांना यश आले. सायंकाळी पळवून नेलेला युवक आणि पळवून नेणारे दोघे पोलीसांच्या ताब्यात आहेत. वृत्तलिहिपर्यंत या घटनेबाबत गुन्हा मात्र दाखल झाला नव्हता.
आज दुपारी 3 वाजेच्यासुमारास अमोल डुकरे (29) हा आपल्या वडीलांसोबत दुचाकी गाडीवर खडपुरा मार्गे पिंपळगावकडे जात होता. खडकपुरा भागात तीन जणांनी त्याला रोखले आणि स्वत:च्या मोटारसायकलवर बसवून लालवाडी मार्गे निघून गेले. घटनेचे माहिती पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्यापर्यंत पोहचली आणि त्यांनी आपले अधिकारी आणि कर्मचारी जोमाने या कामासाठी आदेशीत केले. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्यासह त्यांचे अनेक अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी अत्यंत विद्युत वेगाने धावपळून करून पळवून नेलेला युवक अमोल डुकरे आणि पळवून नेणाऱ्या पैकी 2 जणांना शोधले. वृत्तलिहिपर्यंत ही सर्व मंडळी पोलीस ठाणे वजिराबाद येथे होती. या संदर्भाचा कोणताही गुन्हा मात्र वृत्तलिहिपर्यंत दाखल झाला नव्हता.