नांदेड

गोदावरी नदीपात्रातील पाण्याचा फुगवटा पुढील तीन-चार दिवस कायम; जायकवाडीचे 18 दरवाजे उघडले

नांदेड(प्रतिनिधी)-अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा पावसाने होत्याचे नव्हते केले. मागील 36 तासापासून नांदेडमध्ये पाऊस पडत नाही. पण गोदावरी नदीपात्राच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होणारी पाण्याची आवक आज गोदावरी नदीची पातळी धोक्याच्या उंचीपर्यंत वाढवली आहे. हीच परिस्थिती पुढील दोन-चार दिवस अशीच राहिल असे दिसते. कारण जायकवाडी प्रकल्पाने आपल्या धरणाचे 18 दरवाजे उघडले आहेत आणि इतर अनेक धरणातील पाण्याचा विसर्ग जायकवाडीमध्ये येत आहे. यामुळे गोदावरी नदीकाठी पाण्याचा फुगवटा तयार झाला असून हा फुगवटा दोन -चार दिवस असाच कायम राहिल. जनतेने आपली काळजी आपण स्वत: घेण्याची गरज आहे.
यंदा पावसाने आपले तांडव दाखवले. निसर्गाच्या समतोलात घडलेल्या बदलाचा हा परिणाम आहे. त्यामुळे आपण सुध्दा निसर्गासोबत छेड-छाड करू नये याची दक्षता घेण्याची गरज आहे. पाऊस येतच नाही या कारणावरून पुर नियंत्रण रेषेत घर बांधणाऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. ती घरे पाण्याने वेढली आहेत. अनेकांना तळ मजला सोडून पहिल्या मजल्यावर राहावे लागत आहे. रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट असून अनेक रस्ते बंद असल्याने वाहतूक खोळंबलेली आहे. मागील 36 तासापासून नांदेड जिल्ह्यात पाऊस नाही पण गोदावरी नदीपात्रात तयार झालेला फुगवटा नदीकाठी असणाऱ्या नाल्यांच्या माध्यमाने शहरात पसरत आहे. त्यामुळे अनेकांना आपली घरे स्थलांतरीत करावी लागली. कांही जण पावसात अडकले. अनेकांचा जीव गेला. जवळपास हजारो कोटी रुपयांचे नुकसान या पावसाने केले आहे. लाखो हेक्टर जमीन पावसाने खरडून काढली आहे. त्यामुळे पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थिती स्वत: मधील आत्मविश्र्वास जागा ठेवण्याची गरज आहे. आपण स्वत: दक्ष राहावे आणि इतरांना मदत करता येईल का यासाठी प्रयत्न करावे. प्रशासन आपल्या पध्दतीने चालतच आहे, काम करतच आहे. अनेक निवारे उघडण्यात आले आहेत आणि अनेकांनी त्यात जनतेसाठी जेवणाची सोयपण केली आहे.
लाभक्षेत्र विकास भवनचे प्रशासक एस.के.सब्बीनवार यांनी 29 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या प्रसिध्दीपत्रकानुसार जायकवाडी धरणात 1 लाख क्युसेक्स वेगाने पाण्याची आवक होत आहे. धरणाचा पाणीसाठा 2136.30 दलघमी आहे. धरणाची टक्केवारी 98.40 टक्के भरली आहे. जायकवाडी धरणातून 75456 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. जायकवाडी धरणाच्या पाणलोटक्षेत्रातील मुळा धरण, नांदुरमधमेश्र्वर, माळुंजा, ओझर, शेंदुरवाडा आणि मुक्त पाणलोट क्षेत्रातून जायकवाडी धरणातील आवक 1 लाख क्युसेक्सपेक्षा जास्त आहे. धरणातील पाण्याची आवक, पाऊस, इतर धरणातील विसर्ग या सर्वांचा विचार घेवून जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.
या परिस्थितीत जायकवाडीचे पाणी पुढे-पुढे सरकत नांदेडला 48 तासात पोहचते. मार्गातील गोदावरी नदीचा फुगवटा वाढवत वाढवत हे पाणी नांदेडला येईल आणि नांदेडच्या गोदावरी पात्रातील पाण्याचा फुगवटा जास्त वाढेल. निसर्गाने केलेले हे तांडव सांभाळतांना आपण स्वत: सुदृढ राहा, सुरक्षीत राहा आणि इतरांना मदत करा या पेक्षा जास्त कांही म्हणणे अवघड आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *