नांदेड(प्रतिनिधी)- 20 आठवड्यात दुप्पट पैसे करून देतो असे सांगून 13 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या सात लोकांपैकी एकाला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी प्रविण कुलकर्णी यांनी जामीन देण्यास नकार दिला आहे.
20 सप्टेंबर रोजी शेख कलीमोद्दीन शेख साबिर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सन 2020 मध्ये त्यांनी ट्रेडविन मल्टीसर्व्हीसेस प्रा.लि.या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुजिबुर कुरेशी रा.चंद्रपूर हे नांदेडला आल्यानंतर त्यांची भेट घेवून कंपनीमध्ये 13 लाख 80 हजार रुपये गुंतवले होते. पण 20 आठवड्यानंतर पैसे आले नाहीत. म्हणून त्यांनी इतवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा क्रमांक 232/2021 दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनात शेख असद यांनी केला.
24 सप्टेंबर रोजी शेख असद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुजिबुर कुरेशी यास चंद्रपूर येथून पकडून आणले. या प्रकरणातील कंपनीचे इतर संचालक नागमणी यादव, शेख साखरे, मनोज कमाले, राहुल माने आणि राजन शर्मा यांना अद्यापही पकडण्यात आलेले नाही. मुजीबूर कुरेशीला न्या.प्रविण कुलकर्णी यांनी 27 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले होते. पोलीस कोठडी संपल्यानंतर मुजीबुर कुरेशी यांच्यावतीने जामीन मागण्यात आला. या प्रसंगी सरकारी वकील ऍड. मोहम्मद रजियोद्दीन यांनी मांडलेला युक्तीवाद ग्राह्य मानुन न्या.प्रविण कुलकर्णी यांनी हा गुन्हा आर्थिक व्यवहाराशी संबंधीत आहे. यातील रक्कम मोठी आहे. अशी कारणे आपल्या निकालात नमुद करून मुजीबुर कुरेशीला जामीन नाकारला आहे. त्यामुळे मुजीबुर कुरेशीचे वास्तव्य सध्या तुरूंगात आहे.
