नांदेड

शेतकर्‍यांच्या संयमाचा अंत पाहू नका 

खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा महाविकास आघाडी सरकारला इशारा 
नांदेड(प्रतिनिधी)-  नांदेड जिल्ह्यात सतत एक महिनाभर अतिवृष्टी होत असतानाही शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्याऐवजी पंचनामे करण्याचे आदेश देऊन महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची क्रूर थट्टा चालविली असून महाविकास आघाडी सरकारने ही क्रूर थट्टा थांबवत शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत न पाहता तात्काळ आर्थिक मदत द्यावी अन्यथा राज्य सरकारला मोठ्या परिणामाला सामोरे जावे लागेल असा इशारा भारतीय जनता पार्टीचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज दिला आहे .
                 नांदेड जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच अतिवृष्टीने कहर केला आहे .या महिन्याभरात अनेक वेळा अतिवृष्टीचा फटका बसल्याने खरिपाची पिके संपूर्णतः नष्ट झाली आहेत. सोयाबीन, तुर मूग, उडीद, ज्वारी आणि पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाचीही प्रचंड हानी झाली आहे . यावर्षीच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच लहरी निसर्गाने शेतकऱ्यांच्या मानगुटीवर संकटाची मालिकाच लादली आहे. तरीही उधारी  करत शेतकऱ्यांनी अत्यंत हिमतीने पेरणी केली होती , परंतु दुर्दैवाने शेतकऱ्यांनी पाहिलेल्या सुखाच्या स्वप्नांवर अतिवृष्टीने पाणी फेरले आहे . नांदेड जिल्ह्यातील 16 ही तालुक्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे .  विविध भागातील शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन नुकसानीची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या नुकसानीची विदारकता समोर येते. अशी परिस्थिती असतानाही शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडे वेळ नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पुराच्या पाण्यामुळे पिकासह शेती खरडून गेली असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला आहे . एकीकडे लहरी निसर्गामुळे  शेतकरी त्रस्त झाला असताना दुसरीकडे शेतकरी विरोधी धोरण घेणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेही शेतकरी वैतागला आहे . किमान हेक्‍टरी 50 हजार रुपये मदत सानुग्रह अनुदान म्हणून जाहीर करावे. खरीपाची पिके उद्ध्वस्त झाल्यानंतरही महाविकास आघाडी सरकारने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्याऐवजी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत वास्तविक  शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी आणि शेतकऱ्यांची चालवलेली क्रूर थट्टा थांबविण्याची गरज आहे. अन्यथा शेतकर्‍यांच्या संयमाचा बांध फुटल्यास महाविकास आघाडी सरकारला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल असा सज्जड इशारा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिला आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.