शासन आणि वरिष्ठ अधिकारी यांनी सत्य शोधण्याची गरज
नांदेडचे आंतरराष्ट्रीय पत्रकार या उपोषणाचे कव्हरेज करण्यासाठी गेले आहेत
नांदेड(प्रतिनिधी)-भोकर येथील पोलीस निरिक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुध्द मुंबईच्या आझाद मैदानमध्ये महिलेने सुरू केलेले उपोषण कोणाच्या छत्रछायेखाली सुरू आहे. याचा शोध सरकारने घ्यायला हवा तरच आपले पोलीस किती छान काम करत आहेत हे शासनाच्या लक्षात येईल. विशेष म्हणजे या घटनेवर पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पण अत्यंत बारकाईची दृष्टी ठेवून त्या घटनांमधील सत्य शोधण्याची गरज आहे. विकास निरिक्षक विकास पाटील यांनी माझी चौकशी करा असे सुध्दा आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले आहे. तरीपण त्यांच्याविरुध्द उपोषणाचा डाव खेळून कोणाला डाव साधायचा आहे हे शोधले तर नांदेडमध्ये काय-काय चालते हे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यासमोर येईल.
कांही दिवसांपुर्वी विलास भगवान हटकरचा मृत्यू झाल्यानंतर त्या संदर्भाने उषाताई नर्तावार या महिलेचे दुकान हटकरच्या नातलगांनी तोडले. त्यापुर्वी पोलीस ठाणे भोकर येथे दाखल झालेल्या गुन्ह्यात उषाताई नर्तावारचा मुलगा आरोपी असल्याने त्याचा शोध सुरू होता. त्या मुलाला न्यायालयाने जामीन दिला. त्यानंतर मात्र उषाताई नर्तावार यांनी पोलीसांविरुध्द निवेदनांचे डोंगर उभे केले. नांदेड येथील पोलीस उपमहानिरिक्षक, पोलीस अधिक्षक आणि भोकरचे कर्तव्यदक्ष अपर पोलीस अधिक्षक यांनी कांहीच कार्यवाही केली नाही म्हणून 27 सप्टेंबर पासून उषाताई नर्तावार यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे.
उषाताई नर्तावार यांच्या उपोषणाचे कव्हरेज घेण्यासाठी नांदेड येथील आंतरराष्ट्रीय पत्रकार गेले आहेत. नुरू चौक भागात घर असलेल्या या पत्रकाराने आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवला आणि त्याला साथ देणारा तो तर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त पत्रकार आहे. सोबतच मीच पोलीस खाते चालवतो असा भ्रम असलेला एक लांडगा सुध्दा या गटात आहे. उषाताई नर्तावार यांनी अगोदर दिलेल्या निवेदनात भोकरचे पोलीस निरिक्षक विकास पाटील यांनी महिलेला लाज येईल असा शब्द बोलल्याचा उल्लेख नव्हता पण आता विकास पाटील यांनी महिलेची बे अब्रु होईल असे शब्द बोलले या मुद्यावर आझाद मैदानला सुरू असलेले उपोषण शासनाला वेठीस धरण्याचा प्रकार आहे.
उषाताई नर्तावार मुंबईला कधी गेल्या. ते आणि त्यांचे इतर नातलग कोणा-कोणाला फोनवर बोलले. आंतरराष्ट्रीय दर्जाचे पत्रकार आणि मी सर्वात हुशार प्राणी आहे असा समजणारा लांडगा यांच्यातील सीडीआर, एसडीआर तपासण्याची गरज आहे. शासनाने आपल्या अधिकाऱ्यावर उपोषणाच्या दबावात कांही निर्णय घेण्याअगोदर त्याची तपासणी करण्याची गरज आहे. तरच शासनाचे सेवक असलेले पोलीस किती चांगले काम करतात हे शासनाच्या लक्षात येईल.
भोकर पोलीस ठाण्याचा अभिलेख आणि परिस्थिती पाहिली असता पोलीस ठाण्याच्या परिसरात तीन सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. पोलीस ठाण्याच्या आत जातांना त्या दरवाज्यावर दोन सीसीटीव्ही आहेत. एवढेच नव्हे तर मुख्य रस्त्यावर पोलीस ठाण्याचा सीसीटीव्ही आहे आणि पोलीस निरिक्षकांच्या कक्षात एक स्वतंत्र कॅमेरा आहे. या सर्व कॅमेऱ्यांची तपासणी करण्यासाठी स्वत: विकास पाटील यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती केली आहे अशी खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. शासनाकडून विचारणा झाली तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भोकर पोलीस ठाण्यातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे आणि त्यांचे फुटेज तपासण्याची गरज आहे. तरच या भोकर पोलीसांवर होणाऱ्या आरोपातील सत्य समोर येईल.
नांदेड जिल्ह्यात कार्यरत कांही सुर्याजी पिसाळ अशा आंतरराष्ट्रीय पत्रकारांना आणि मीच पोलीस खाते चालवतो असा समज असलेल्या लांडग्यासोबत आपले फोटो काढतात मग विकास पाटील आणि त्यांचे सहकारी अधिकारी कांबळे यांची काय बिसात. खरे तर हा प्रकार भोकर येथील आहे. भोकर म्हणजे नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा मतदार संघ. आपल्याच मतदार संघात काय चालले आहे, त्यात काम करणारी पोलीस मंडळी कशी आहे याची जाण त्यांना नसेल असे लिहिण्याची हिंम्मत आमची पण नाही. पण सध्या सुरू असलेला प्रकार अत्यंत चाणाक्षपणे अशोक चव्हाण तपासतील असा विश्र्वास आहे. एकूणच या उपोषण प्रकरणाला अत्यंत लांबलचक विचार करून तपासण्याची तयारी ठेवलीतरच नांदेडमध्ये असणारी बरीच घाण कमी करण्यात प्रशासनाला यश येईल. या घाणीमुळे नांदेड जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसासह प्रशासनिक अधिकारी त्रासलेले आहेत. बघु या काय होईल.