तंत्रज्ञान नांदेड

देगलूर विधानसभा मतदार संघात आदर्श आचार संहिता जारी 

30 ऑक्टोबर रोजी मतदान; 2 नोव्हेंबर रोजी मतमोजणी 
नांदेड(प्रतिनिधी)-देशात 33 मतदार संघामध्ये पोट निवडणूका जाहिर करण्यात आल्या आहेत. त्यात नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. या निवडणुकीची आचार संहिता आजपासून लागू झाली आहे. 
                देगलूर विधानसभा मतदार संघातील आ.रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना आजाराने निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली आहे. या पोट निवडणुकीसाठी बऱ्याच दिवसापासून अनेक राजकीय पक्ष कंबर कसून आहेत. या निवडणुकीसाठी 30 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. आणि 2 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. या निवडणूकीसाठी 8 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येतील. 11 ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी होईल. 13 ऑक्टोबरपर्यंत अर्ज परत घेता येतील. त्यानंतर अवघ्या 17 दिवसात म्हणजे 30 ऑक्टोबर रोजी देगलूर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदान होईल. 2 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे.
                  आज दि.28 सप्टेंबर पासून या निवडणुकीची आचार संहिता लागू झाल्याचे निर्देश जिल्हा  निवडणुक अधिकारी डॉ.विपीन यांनी जारी केले आहेत. या अनुषंगाने  देगलूर विधानसभा मतदार संघाच्या हद्दीत पदाधिकारी व राजकीय पक्षांचे पोस्टर, बॅनर्स, तात्काळ काढून घेण्यात यावे असे आदेश देण्यात आले आहेत. सोबतच ज्या लोकांकडे शासकीय वाहने आहेत. त्यांनी आपले वाहन आजच शासकीय कार्यालयामध्ये जमा करावेत. निवडणुकीसंदर्भाने आदर्श आचार संहिता काटेकोरपणे पाळण्यात यावी असेही डॉ.विपीन यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.  आपल्या आदेशाच्या प्रति पोलीस अधिक्षक नांदेड, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार यांना सुध्दा पाठविल्या आहेत. 
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.