क्राईम

स्त्री भ्रूणहत्येसाठी आवश्यक असलेले औषधी विकणाऱ्या महिलेला अटकपुर्व जामीन नाकारला

नांदेड(प्रतिनिधी)-शासनाने प्रतिबंधीत केलेल्या भ्रूणहत्येसाठी उपयोगात येणाऱ्या औषधी विकणाऱ्या एका फॉर्मा कंपनीच्या मालकीनला अटकपुर्व जामीन नाकारतांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.डी.खोसे यांनी या प्रकरणात पोलीस कोठडीतील तपास आवश्यक असल्याचे आपल्या आदेशात म्हटले आहे.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात औषधी निरिक्षक माधव जगन्नाथ निमसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आशिषनगर, वाडी (बु) येथे मॅट्रो फॉर्मा नावाचे औषधी दुकान आहे. या दुकानातील तपासणी केली असता 1 एप्रिल 2021 ते 2 जुलै 2021 पर्यंत झालेल्या औषधांचा विक्री अभिलेख पाहिला असता त्यात कॉम्बीपॅक मिफेप्रीस्टोन आणि मिसोस्प्रोस्टोल टॅबलेट्‌ आय.पी.हे औषध बीड, हिंगोली, परभणी, लातूर, उस्मानाबाद, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि यवतमाळ या जिल्ह्यातील अनेक डॉक्टरांना विक्री केल्याचे देयक सापडले.कॉम्बीपॅक मिफेप्रीस्टोन आणि मिसोस्प्रोस्टोल टॅबलेट्‌ आय.पी. हे औषध गर्भवती महिलांना देवून स्त्रीभू्रणहत्या करण्यासाठी वापरले जाते. निमसे यांच्या तक्रारीवरुन भाग्यनगर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 247/2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 177, 336, 420, 468, 471, 34 आणि औषधी द्रव्य व सौंदर्य प्रसाधने अधिनियम 1945 च्या कलम 65(5), 65(9) (ब) प्रमाणे दाखल केला. भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक अभिमन्यु साळुंके यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक प्रशांत जाधव यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये मॅट्रो फॉर्माच्या मालकीण मालती दिपक भोरगे, प्रकाश सुदाम लोखंडे, बुध्दानंद थोरात, मयुर वेलापूरे आणि मयुर लोले अशा पाच जणांची नावे आरोपीच्या रकान्यात आहेत.
गुन्हा दाखल होवून जवळपास 2 महिने झाले आहेत. दरम्यान मॅट्रो फॉर्माच्या मालकीण मालती दिपक भोरगे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपुर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज क्रमांक 563/2021 दाखल केला. या प्रकरणात पोलीसांनी केलेले सादरीकर आणि सरकारी वकील ऍड. रणजित देशमुख यांनी मांडलेला युक्तीवाद ग्राहय मानुन न्या.एन.डी.खोसे यांनी या प्रकरणात पोलीस कोठडीतील तपास आवश्यकच आहे अशी नोंद आपल्या निकालपत्रात करून मालती भोरगे यांचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *