नांदेड(प्रतिनिधी)-प्रसिध्द सामाजिक नेता माधव देवसरकर यांच्या प्रकरणात भारतीय दंड संहितेचे कलम 354 वाढविल्याची माहिती न्यायालयातील सुत्रांनी दिली आहे. सोबतच माधव देवसरकरकडे असलेले अग्निशस्त्र (पिस्तुल) परवाना रद्द करण्याची शिफारस जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे केली असल्याची माहिती पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी दिली आहे.
कांही दिवसांपुर्वी एका महिलेच्या पतीने पत्रकार परिषद घेवून आपल्या पत्नीवर झालेला अन्याय सार्वजनिक केला होता. त्यानंतर 6 तासांनी नांदेड ग्रामीण पोलीसांच्या दप्तरी माधव देवसरकरविरुध्द महिलेच्या तक्रारीवरुन भारतीय दंड संहितेच्या कलम 509 प्रमाणे गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा अदखल पात्र आहे. फौजदारी कायद्यात झालेल्या सुधारणानंतर अशा प्रकारचे महिलेवर अन्याय झालेले गुन्हे दाखल न करणाऱ्या संबंधीत बडेजाव करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरुध्द भारतीय दंड संहितेतील कलम 166 प्रमाणे गुन्हा दाखल करावा अशी सोय कायद्यात आहे. याची जाणिव कांही प्रसार माध्यमांनी करून दिल्यानंतर माधव देवसरकरविरुध्द महिलेकडून नवीन अर्ज घेवून कलम 354 वाढविण्यात आले ही माहिती न्यायालयीन सुत्रांनी दिली आहे.
या संदर्भाने पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी सांगितले की, माधव देवसरकरकडे असलेले अग्नीशस्त्र(पिस्तुल) परवाना रद्द करण्याची शिफारस पोलीस अधिक्षक कार्यालयाने जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे केली आहे.
