महाराष्ट्र

परतीचा पाऊस राज्याला झोडपणारच  

नांदेड-लातूर-हिंगोली-परभणी पुढील दोन दिवसात रेड अलर्ट झोनमध्ये 
नांदेड(प्रतिनिधी)- परतीचा पाऊस धुवून काढणार असा इशारा भारतीय हवामान विभागाचे वैज्ञानिक कृष्णानंद ओसलीकर यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर दिले आहे. याचा प्रभाव गुजरात आणि महाराष्ट्रात दिसणार आहे. आज रविवारी नांदेड जिल्ह्यात पावसाने लावलेल्या हजेरीनंतर सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे दिसले. यावरून परतीचा पाऊस झोडपणारच अशी चिन्हे दिसत आहेत. नदी काठी राहणाऱ्या नागरीकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.
                        सध्याच्या परिस्थितीत ओडीसा आणि आंध्र प्रदेशच्या समुद्र तटावर हवामान खात्यातील वैज्ञानिक कृष्णानंद ओसलीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार चक्रवाट वावटळ तयार होणार आहे. बंगालच्या खाडीत सुध्दा कमी प्रभावाचे क्षेत्र तयार झाले आहे. चक्रवाट वावटळ ओडीसा आणि आंध्र प्रदेशच्या समुद्र तटांवर धडक मारणार आहे. याचा प्रभाव मुंबई, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात दिसणार आहे. अत्यंत जास्त वेगाने वायु वाहणार आहेत. हा प्रभाव 27 आणि 28 सप्टेंबर रोजी जास्त प्रमाणात दिसणार आहेत. यासाठी समुद्र तटीय क्षेत्रात राहणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
                             हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सोमवार दि.27 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सातारा, रायगड, रत्नागिरी, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, गडचिरोलीसह एकूण 11 जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी राज्यात अतिवृष्टी होण्याची संभावना आहे. मंगळवारी रायगड, ठाणे, पालघर, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांना रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. पुणे, नाशिक, रत्नागिरी, औरंगाबाद, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यांना औरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजाच्या अगोदरच आज रविवारी नांदेड जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाला सुरूवात झाली. पण दुपारी तर पावसाने रोद्ररुप धारण केले. हा प्रभाव सायंकाळी वृत्त लिहिपर्यंत सुरूच होता. वृत्तलिहितांना सुध्दा ढगाळ वातावरण आहे आणि पावसाची शक्यता दिसतच आहे.
                          नांदेड जिल्ह्यातील सर्व पाणी प्रकल्प पुर्ण भरले आहेत. त्यामुळे त्यातून सुध्दा पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नदी काठी राहणाऱ्या लोकांनी सुध्दा दक्ष राहण्याची गरज आहे. नांदेड जिल्हा प्रशासन सुध्दा कोणत्याही अपातकालीन परिस्थितीसमोर दृढपणे उभे राहण्यास तयार आहे. जनतेने सुध्दा अफवांवर विश्र्वास ठेवण्यापुर्वी प्रशासनाशी संपर्क साधून माहिती घ्यावी.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.