इमानदारीने तपासणी झाली तर जीएसटीचा मोठा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता
नांदेड(प्रतिनिधी)-काल दि.25 सप्टेंबर रोजी नांदेड शहरातील नेते किंबहुना व्यापारी अशी दोन पदे असणाऱ्या दोन जणांच्या कार्यालयावर आयकर खात्याने तपासणी केली. ही तपासणी योग्यरितीने झाली तर जीएसटी करासंदर्भाचा मोठा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता आहे. हे दोन नेते/ व्यापारी राजकीय पक्षात वजन ठेवणारे आहेत.
काल 25 सप्टेंबर रोजी आयकर विभागाच्या 4 ते 5 वाहनांमध्ये 25 ते 30 लोक आले आणि त्यांनी आनंद नगर येथील राज मॉलमध्ये असलेल्या एका कार्यालयात आणि आयटीआयजवळ असलेल्या एका कार्यालयात तपासणी केली. कोणत्याही आयकर अधिकाऱ्याने त्या ठिकाणी काय सापडले किंवा काय तपासणी करण्यात आली याबद्दल कांही एक माहिती सांगितली नाही. तरीपण आयकर खात्याने केलेली ही तपासणी 5 ते 6 तास सुरू होती.
खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील कांही लोकांनाकडे आयकर खात्याने तपासणी केली तेेंव्हा नांदेड येथील दोन नेते/ व्यापारी यांची नावे समोर आली. त्यानंतर आयकर विभागाने नांदेड येथे या दोन व्यक्तींच्या कार्यालयांची तपासणी केली. या दोन नेते/ व्यापाऱ्यांकडे सिमेंटचा मोठा व्यवसाय आहे. याबद्दल एका आयकर सल्लागाराने सांगितले की, सिमेंटमध्ये जीएसटी वाचविण्याचा खुप मोठा कारभार आहे आणि यातूनच ही तपासणी झाली असेल. आयकर विभाग वेगळा विषय आहे आणि वस्तु सेवा कर (जीएसटी) हा वेगळा विषय आहे. आयकर विभागाने आपले काम केल्यानंतर सुध्दा यातून जीएसटीचा मोठा घोटाळा समोर येवू शकतो. पण त्यासाठी कागदपत्रांची तपासणी इमानदारीने व्हायला हवी असे मत आयकर सल्लागाराने व्यक्त केले.
