नांदेड येथील तीन जणांचा समावेश
नांदेड(प्रतिनिधी)- केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) परीक्षेमध्ये सन 2020 च्या परीक्षांचा निकाल आला तेव्हा नांदेड येथील एका शिक्षीकेने मिळवलेले यश महत्वपूर्ण आहे. एकूण महाराष्ट्रात 100 पेक्षा जास्त युवक-युवतींनी या परीक्षेत यश मिळविले आहे. नांदेड येथील एकूण 3 युवक या परीक्षेत यशवंत ठरले आहेत.
नागणी ता. बिलोली येथील दत्ताहरी नागोराव धोतरे हा युवक 1993 मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी नांदेडला आला. पदव्युत्तर शिक्षण घेत-घेत त्यांनी पत्रकारितेत आपले पाऊल ठेवले. धर्माबाद येथील सुर्यकांता यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले. लग्नाच्या नंतर त्यांच्या संसारात सुमित आणि सुविधा नावाची दोन फुले उमलली. सुर्यकांता दत्ताहरी धोतरे ह्या नागसेननगर नांदेड येथील मुकूंद आंबेडकर प्राथमिक शाळा येथे सहशिक्षक म्हणून काम करू लागल्या. अनेक बालक-बालिका घडविताना सुर्यकांता यांनी आपल्या लेकरांवर सुद्धा पूर्ण लक्ष ठेवले आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत राहिले. यामध्ये सुविधा यांनी एन्टीरिएर डिझायनरचे शिक्षण घेतले आणि सध्या त्या हैद्राबाद येथे कार्यरत आहेत. सुमित लहान पणापासनूच मी सर्वांच्या पुढे कसा राहील यासाठी आपल्या आई-वडिलांच्या मार्गदर्शनात हळूहळू गुणवंतच होत गेला. सुमित हा दहावी वर्गाची परीक्षा पास झाला तोपर्यंत त्याने वेगवेगळ्या 27 परीक्षा दिल्या होत्या आणि त्यात बहुतांश जागी तो प्रथम क्रमांकावरच असायचा. गणेशनगर भागातील टायनी एजंल्स या शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर सुमितने टी.पी. भाटिया कॉलेज मुंबई येथून अकरावी आणि बारावीचे शिक्षण घेतले. यानंतर त्याच्यात असलेल्या गुणवत्तेने अनेक शिष्यवृत्त्या मिळाल्या. बार्टी या संस्थेने सुद्धा सुमितची दखल घेतली आणि शिक्षणासाठी भरपूर मदत केली. त्यानंतर त्यांना आयटीआय खडकपूर येथून आभियांत्रिकी पदवी प्राप्त केली आणि एका खाजगी कंपनीत काम सुद्धा सुरू केले. पण आपला उद्देश हा नाही, यासाठी त्यांनी युपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. परीक्षेचा निकाल आला तेव्हा त्यांचा गुणवत्ता क्रमांक 660 आला. सुमितचा निकाल आल्यानंतर त्यांच्या घरी अभिनंदन देणाऱ्यांची रिघ लागली आहे. आज भदंत पय्याबोधीजी, रामप्रसाद खंडेलवाल, ऍड. दीपक शर्मा, कंथक सुर्यतळ आदींनी सुमितचे आई-वडील दत्ताहरी आणि सुर्यकांता यांना भेटून अभिनंदन केले.
सुर्यकांता धोतरे यांच्यावर निसर्गाने काहीशी अवकृपा केलेली आहे. पण निसर्गाने दिलेल्या इतर बाबींवर त्यांनी लक्ष करत आपल्यामध्ये निसर्गाने दिलेली कमतरता अत्यंत समर्थपणे खोडून काढली आणि त्यांनी आपलाच मुलगा घडविला नाही तर त्यांनी शिक्षण दिलेले बरेच युवक-युवती आज पदव्युत्तर शिक्षण घेऊन तयार आहेत. काही जणांनी मोठ्या पदावर आपली दौड कायम ठेवली आहे आणि अजूनही त्यांना सुमित सारखे अनेक विद्यार्थी तयार करायचे आहेत. आज सुमितच्या घरात अभ्यासाचा एवढा भंडार आहे की, कोण्या नवीन विद्यार्थ्याने त्याची ती संपत्ती मनाने वाचली तर कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय तो युपीएससी पास करू शकेल. सुर्यकांता यांनी मेहनतीचे फळ असे आहे की, ‘ तुम्ही त्यांना दगड म्हणताल. त्यांना निरखून पहा, त्यात सुद्धा आग असते’, त्यामुळे प्रत्येकाने आपले ध्येय एकदा ठरविले तर ते गाठयला वेळ लागत नाही आणि यश मिळविणाऱ्या सुमित धोतरेसह त्यांचे आई-वडिला सुर्यकांता दत्ताहरी धोतरे यांचे सुद्धा कौतुकच करावे लागेल.
सुमितसह नांदेड येथील इतर दोन युवक युपीएससीच्या परीक्षेमध्ये यशवंत ठरले आहेत. नांदेड जिल्ह्यातील रजत नागोराव कुंडगीर, शिवहार चक्रधर मोरे हे दोघे सुद्धा युपीएससीच्या परीक्षेत यशस्वी ठरले आहेत. त्यात शिवहार मोरे हा 649 व्या गुणवाा क्रमांकावर आहे. सोबतच रजत कुंडगीर सुद्धा युपीएससी परीक्षेत यशस्वी झाला आहे. देशात 180 आयएएसच्या जागा रिक्त आहेत. त्यात सर्वसामान्य गट-72, ईडब्ल्यूएस-18, ओबीसी-49, अनुसूचित जाती-28, अनुसूचित जमाती-13 अशी आकडेवारी आहे. एकूण 761 उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील यशवंतांचा क्रमांक 100 पेक्षा जास्त आहे. त्यात राज्यातून मृणाली जोशी यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. देशात त्यांचा 36 आहे. तसेच राज्यात विनायक नरवाडे हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत तर देशात त्यांचा क्रमांक 37 वा आहे. यंदाच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील 100 पेक्षा जास्त उमेदवारांनी यश मिळविले आहे. देशातल्या पहिल्या शंभरमध्ये महाराष्ट्राचे 5 उमेदवार आहेत.