महाराष्ट्र

नांदेड जिल्ह्याचे सुपूत्र विवेक राम चौधरी होणार एअर चिफ मार्शल

नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्याच्या आजपर्यंतच्या मानात एक नवीन तुरा लवकरच खोवला जाणार आहे. नांदेड जिल्ह्याचे सुपूत्र विवेक चौधरी हे या महिन्यात भारतीय वायुदलाचे प्रमुख होणा आहेत.
सध्या भारतीय वायुदलाचे प्रमुख एअर चिफ मार्शल आर.के.एस.भदोरीया हे 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. केंद्र सरकारने त्यांच्या जागी नांदेड जिल्ह्याचे सुपूत्र विवेक राम चौधरी यांची निवड केली आहे. त्यामुळे देशाचे नवीन एअर चिफ मार्शल नांदेड जिल्ह्याचे आहेत. विवेक राम चौधरी यांचा जन्म हदगाव तालुक्यातील हस्तरा या छोट्याशा गावात झाला. त्यांनी प्राथमिक शिक्षण नांदेड येथे घेतले आणि नंतर पुण्याच्या सैनिकी शाळेत त्यांनी शिक्षण घेतले.
विवेक चौधरी यांचे आजोबा हदगाव तालुक्यातील कोई येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. त्यांचे दोन काका दिनकर आणि रत्नाकर हे सध्या नांदेडला वास्तव्यात आहेत. नॅशनल डिफेन्स अकदामीचे माजी विद्यार्थी विवेक चौधरी 29 डिसेंबर 1982 मध्ये वायुदलात रुजू झाले. त्यांनी आपल्या सेवाकाळात मिग आणि सुखोई हे दोन विमान उडवून 3800 तासांचा विमान उडविण्याचा अनुभव त्यांच्या खात्यात जमा आहे. पश्चिम विभागाचे कमांडर इन चिफ या पदावर सुध्दा विवेक राम चौधरी यांनी काम केले आहे. संवेदनशिल अशा लदाक, उत्तर भारतातील हवाई संरक्षणाची जबाबदारी पश्चिम विभागावर असते.
नांदेडचा एक भुमिपूत्र देशाच्या स्तरावर आपले नाव कोरणार आहे. सैन्यदलातील एका विभागाच्या प्रमुख पदापर्यंत मजल मारून विवेक राम चौधरी यांनी आपली ध्येय गाठण्याची इच्छा दाखवली आहे. नांदेड येथे आज शैक्षणिक क्षेत्रात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा एक वेगळा आदर्श आहे. विवेक राम चौधरी आणि त्यांच्या कुटूंबियांचे नांदेड जिल्ह्यात अभिनंदन होत आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.