क्राईम

29 मार्चच्या गुरूद्वारा परिसरातील घटनेत 6 जणांना उच्च न्यायालयाने दिला जामीन

गुरूद्वारा परिसरात भारतीय दंड संहितेचे कलम 149 लागू होवू शकत नाही
नांदेड(प्रतिनिधी)-गुरूद्वारा परिसर हा सार्वजनिक परिसर आहे. त्यामुळे या ठिकाणी भारतीय दंड संहितेतील कलम 149 लावता येत नाही. तसेच या प्रकरणातील सर्व साक्षीदार हे पोलीस आहेत. त्यामुळे साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रश्न उदभवत नाही अशी नोंद आपल्या निकाल पत्रात करून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्यायमुर्ती एम.जी. शेवलीकर यांनी 29 मार्च 2021 च्या घटनेतील सहा जणांना जामीन मंजुर केल्याची माहिती ऍड. मनप्रितसिंघ गं्रथी यांनी दिली आहे.
29 मार्च रोजी गुरूद्वारा परिसरात झालेल्या गडबडीत पोलीसांवर हल्ला झाला. असे तीन गुन्हे वजिराबाद पोलीसांनी दाखल केले होते. त्यातील गुन्हा क्रमांक 114 प्रकरणात पोलीसांनी जवळपास 22 ते 24 लोकांना अटक केली होती. जवळपास 130 दिवस तुरूंगात राहिल्यानंतर नांदेडचे जिल्हा न्यायाधीश एन.डी.खोसे यांनी दोन जणांना जामीन मंजुर केला होता. इतरांचा तुरूंगवास वाढला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आज दि.21 सप्टेंबरच्या बोर्डावर नियमित जामीन अर्ज क्रमांक 919 मध्ये सहा जणांच्या जामीन बाबत सुनावणी झाली. त्यात सुदर्शनसिंघ कुलवंतसिंघ शाहु, कश्मीरसिंघ प्रेमसिंघ हंड्डी, सतनामसिंघ हरीसिंघ उर्फ पट्टूसिंघ पुजारी, अजितपालसिंघ उर्फ गब्बु प्रितपालसिंघ ग्रंथी, मनमोहनसिंघ उर्फ सन्नीसिंघ देवेंद्रसिंघ सेवादार(पाठी), राणासिंघ मायासिंघ टाक यांचा समावेश होता.
या सुनावणी दरम्यान न्यायमुर्ती एम.जी. शेवलीकर यांनी भारतीय दंड संहितेतील कलम 149 गुरूद्वारा परिसरात लागू होवू शकत नाही कारण गुरूद्वारा परिसर हा सार्वजनिक परिसर आहे , तेथे धार्मिक कार्यासाठी अनेक लोक येतात. म्हणून बेकायदा जमाव असा त्याचा अर्थ लावता येणार नाही. सोबतच या सहा जणांविरुध्द कांही प्रत्यक्ष पुरावे या खटल्यात दिसत नाहीत. या प्रकरणातील जखमी पोलीस संजय पांडे हे दवाखान्यातून बाहेर आले आहेत. तसेच या प्रकरणातील सर्व साक्षीदार हे पोलीस आहेत. त्यामुळे साक्षीदारावर दबाव निर्माण होण्याचा प्रश्न उदभवत नाही अशा नोंदी आपल्या निकालपत्रात करून न्यायमुर्ती एम.जी.शेवलीकर यांनी या सहा जणांना जामीन मंजूर केल्याची माहिती ऍड. मनप्रितसिंघ ग्रंथी यांनी दिली. या प्रकरणात 6 जणांच्यावतीने ऍड. राजण देशमुख, ऍड. ज्यॉयदिप चटर्जी, ऍड.सत्यजीत जाधव, ऍड. विक्रम कदम, ऍड. गणेश गाडे, ऍड. अमनपालसिंघ कामठेकर, ऍड. सरबजितसिंघ शाहु आणि ऍड. राजवंतसिंघ यांनी काम पाहिले. या प्रकरणातील अजूनही बरेच जण तुरूंगात आहेत.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *