नांदेड

पोलीस सामाजिक भान सुध्दा ठेवतात; दखल घेण्यासारखा प्रसंग 

नांदेड(प्रतिनिधी)-लेखणीच्या माध्यमातून नेहमी पोलीसांवर टिका करण्यात सर्वांनाच रस असतो किंबहुना त्यातच आपली धन्यता मानली जाते. आणि आम्ही कांही शोध पत्रकारीता केली असे दाखविण्याचा प्रयत्न होतो. आज कांही असा एक प्रसंग आम्हाला पाहायला मिळाला. त्याची दखल आम्ही घेतली नसती तर आम्ही सुध्दा स्वत:ला बोरुबहाद्दर म्हणण्या पलिकडे शिल्लक राहिलो नसतो.
आज दि.21 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्यासुमारास वजिराबाद चौकातून जात असतांना भरपूर वाहतुक होती. एक सिग्नल सुरू असेल तर दुसरे बंद ते सुरू झाले तर तिसरे बंद म्हणजे हा वर्तुळातला प्रकार आहे. ज्यामध्ये वाहनांची धावण्याची तिव्रता कांही कमी होत नव्हती. या घाई घडबडीमध्ये दोन ग्रामीण भागातील माणसे रस्ता पार करण्यासाठी उभी होती. त्यांना दक्षीणेकडून उत्तरेकडे जायचे होते. दोन पावले पुढे ठेवली की एक वाहन येत होते. त्यामुळे त्यांना थबकावे लागत होते. ही घाई घडबड बऱ्याच वेळ सुरू होती. आम्ही सुध्दा पाहत होतो. पण आम्हाला त्यांची मनशा कळली नाही. तेवढ्यात एका बाजून स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गोविंदराव मुंढे आले. शेवटी पोलीस तो पोलीस असतो, गोविंदराव मुंढे यांना त्या ग्रामीण भागातल्या माणसांची अडचण लक्षात आली. तेंव्हा त्यांनी त्या दोघांचे हात धरून वाहनांना थांबण्याचा इशारा करून त्या दोघांना दक्षीण ते उत्तर हा रस्ता पार करून दिला. त्यांनी रस्त्याच्या पुर्ण पलिकडे जाईपर्यंत गोविंदराव मुंढे रस्त्यावरच उभे होते. हा प्रसंग आपल्या कॅमेऱ्यात कैद केला सुजय पाटील यांनी.
आम्ही या घटनेची दखल घेतली नसती तर आम्ही स्वत:च्याच लेखणीसोबत बेईमानी केल्यासारखे झाले असते. आम्ही हे वृत्त प्रकाशीत करून असे सांगू इच्छीतो की, पोलीस चुकला असेल तर त्याच्यावर टिका करण्याचा अधिकार जसा सर्वांना माहित आहे. तसे पोलीसांनी चांगले काम केल्यानंतर त्यांची प्रशंसा करण्याची दानत प्रत्येकाने बाळगली पाहिजे. आम्ही आमच्या घरी गणपती साजरा करतो पण आपला गणपती आणण्यासाठी पोलीसांना वेळ मिळत नाही. आम्ही वाजत गाजत, नाचत आपल्या गणपतीला निरोप देतो पण पोलीस आपल्याला कांही समस्या येवू नये म्हणून रस्त्यावर उभा राहतो. आम्ही तर गणपतीला निरोप देवून आलो आणि झोपलो पण पोलीस रात्रभर आमच्या सुरक्षेसाठी जागा होता. हे सुध्दा लक्षात घ्यायला हवे.
आज स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गोविंदराव मुंढे यांनी दोन लोकांना रस्ता पार करून दिला ही घटना छोटीशी आहे. पण त्यामधला मतितार्थ मोठा आहे. महाराष्ट्र पोलीस कायद्यामध्ये सुध्दा अनाडी, महिला, बालके, जास्त वय असलेली मंडळी या सर्वांना पोलीसांनी प्राधान्याने मदत करावी अशी तरतूद आहे. इतर पोलीसांनी सुध्दा सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गोविंदराव मुंढेंच्या या कामाकडे पाहुन स्वत:मध्ये बदल घडविण्याची गरज आहे. जनतेने आणि इतर सर्वांनी पोलीसांच्या टिका-टिपण्या प्रसारीत करतांना पोलीसांनी दाखवलेल्या अशा नवीन पोलीसींगची पण दखल घ्यायला हवी.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *