निसर्गाच्या कुशीत दडलेले अद्भुत चमत्कार म्हणजेच सांधण व्हॅली अर्थात सांधण दरी. आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यांमध्ये ह्या व्हॅलीच दूसरा क्रमांक लागतो.एका अतिप्राचीन भौगोलिक प्रस्तरभंग रेषा म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी. हा निसर्गाचा अद्भुत चमत्कारच! सह्याद्रीच्या पर्वतरांगा नांदेड ट्रेकर्सना नेहमीच मोहवत असतात. पण ह्या वेळेस हे आश्चर्य आम्हा नांदेड ट्रेकर्सना भुरळ घालत होते. आमचा जथ्था नांदेडहून राज्यराणीने नाशिकला रवाना झाला. नांदेडचे भूमीपुत्र पण नाशिकला कार्यरत असणारे अरविंद नरसीकर व संजीवनी वाहिनी यांची भेट घेतली. वाहिनीनी नावाप्रमाणेच मैत्रीच्या धाग्यांना संजीवनी शिंपडून जीवंत केलेले. त्यांच्या हृदयस्थ पाहूणचाराने व आपुलकीने मन भारावून गेले. आम्ही त्या दिवशी अंजनेरी ट्रेक केला. अंजनेरी पहाडचे रौद्र दर्शनानंतर वेध होते सांदण दरीचे.
नाशिक मुंबई महामार्गाने घोटीच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला.थोड्याच वेळात डावीकडे ओंढा,पट्टा,डूबेरे उजवीकडे अंजनेरी, घारगड, कावनई असे किल्ले दिसू लागले. भंडारदऱ्याच्या सौंदर्याची चाहूल तर नाशिक हून वळतानाच जाणवते. हा वेगळा प्रवास आहे.वेगळा रास्ता आहे ह्याचा दिलासा इथूनच वाटतो. निसर्गाच्या कुशीत वसलेला भंडारदरा, पर्वतराजीने नटलेला. सर्वत्र हिरवा फंक्त हिरवा रंग पाहून वृत्तीला नवी पालवी फुटते.आपणही हिरवेगार होऊन जातो.त्या शूद्ध मोकळ्या हवेत फुफ्फुसाची कवाड उघडी होतात. भणाणगार वार थेट वेळूच्या बनात जात. निसर्गाच्या त्या नयनरम्य नजराण्याने अननुभूत उत्साह गात्रागात्रातून सळसळू लागतो. मोकळ आकाश,हिरवी धरित्री आणि गगनचुंबी शिखर मनाला वेडाहून टाकतात. मृगजळ जसे फसवते तसे इथली कळसूबाई शिखर फसवतात.
गाडीतही सर्व ट्रेकर्सच्या हृदयाची कवाडेही खुलत होती. ट्रेक मध्ये सर्वात मोठा आनंद आपल्याच सारखा सहप्रवासी मिळाल्याचा! एरवी छुपेरुस्तूम, अबोल असणारे सर्व मित्र दिलखुलास हसत होते. काही कालावधीतच खाचाखोचा, कोपरखळ्या,प्रासंगिक युक्ता प्रयुक्त्या, चिमटे, अशी मैफिल रंगली. प्रतिसाद, दिलखुलास,हसणं, टाळ्या वाजवण हे सर्व रसिकता व मनाचा मोठेपणा यावर अवलंबून असत.
आमची गाडी कधी दाट झाडीतून तर कधी उघड्या आभाळाच्या साक्षीने चढउतारावर शेंडी गावाकडे मार्गक्रमण करीत होती. वाटेने कळसूबाई,अलंग,कुलंग व मदनगडाची रांग.बाजूलाच घनचक्कर रांग त्याचे मुडा हे सह्याद्रीतील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखरही रौद्र दर्शन देतात. रात्री आमचा मुक्काम जलाशय समोरच तर बाजूला महाकाय आजोबा पर्वत,कुलंगच्या समोरच घनदाट वृक्षवल्लीतच उभारलेल्या तंबूत केला. समोर वनातील पुष्पांनी असा साज वेलींवर चढवला होता की सुगंधालाही शब्द फुटावेत. चांदण्यारात्री नटलेली पृथ्वी,नदीच्या जलप्रवाहाचा आवाजही मनाला मोरपिसासारखे स्पर्श करत होता.वनातील वेगवेगळ्या रानफुलांचा,रातराणीचा सुगंध दरवळत होता. धरतीवर स्वर्गाचे अवतरण झाले की काय असे वाटत होते.
प्रत्येकाचे चार भिंतीत आयुष्य सुरक्षिततेची चादर पांघरून झोपलेले असते पण ट्रेक मध्ये निसर्ग तुम्हाला सुखावत थोपटत असतो. ट्रेकमुळे मित्रत्वाची भावना पुस्तकातून जाणिवे मद्धे येते. मनातील सुख दुख यांना वाचा फुटते.आपोआपच बोलघेवड्यांचे शेत व गप्पांचे मळे पिकतात. संसाराच्या, व्यवसायाच्या, सुखाच्या, दु:खाच्या, उपेक्षा अपेक्षांच्या पूर्तीच्या भंगाच्या सगळ्या समस्यावर चर्चा होते निवारण निघतात.प्रत्येकाच्या आयुष्याच्या ग्रंथाची गीतावचन होत असते.श्वासा श्वासागणिक अनेक रूप दिसतात. कितीतरी दिवसांनंतर हास्याचे तुषार उडाले.
दुसऱ्या दिवशी सूर्याचे विविध रूप रंगात दर्शनाचे भाग्य लाभले. गाडीतून जाताना घनदाट भरून आलेल्या आकाशाच्या हिरव्याकंच शालू नेसलेल्या जमिनीवर आकाशाला गवसणी घालणाऱ्या पर्वतराजीतूनं जेव्हा स्फटिकासारखे जलप्रपात कोसळतात तेव्हा त्यांच्या संगीताचा आनंद म्हणजे आयुष्यातील स्वर्गाची अनुभूति. काहीजण छायाचित्रांकण करण्यात दंग झाले.
आम्ही सामृद गावातून सांदण दरीकडे गेलो. सांदण दरीचे वैशिट्य म्हणजे ही जमिनीच्या पातळीखाली आहे. इथे खाली थोडेसे उतरावे लागते. अतिशय अरूंद अशी ही लांबच लांब जमिनीला पडलेली भेग आहे. सांदण दरीत उतरण्याची वाट फार सोपी आहे. रॅपलिंग, व्हॅली क्रॅासिंग,फ्लाविंग फॉक्स,जायंट स्विंग असा साहसी प्रकार करणारे पुढे अनेक पर्यटक नजरेस पडतात. आम्ही रॅपलिंग करत खाली उतरलो. घळीच्या सुरुवातीलाचा एक जिवंत झरा आहे जो कधीही आटत नाही. दगडांनी तो बंदिस्त केल्यामुळे अतिशय निर्मळ असे ते थंडगार पाणी पिवून आम्ही उत्साहित झालो. घळ उतरायला लागलो. सुरुवातीचा सोपा कातळटप्पा उतरुन आम्ही आत दरीच्या नाळेत प्रवेश केला. आत दरीचे सापासारखे लांबच लांब वळण दिसत होते. काही ठिकाणी / फूट तर काही ठिकाणी जेमतेम / फूट अशी ती अतिशय निरुंद नाळ होती. दोन्ही बाजूला काळ्याकभिन्न कातळकड्यांनी ती बंदिस्त केली होती.
पहिला कातळ्टप्पा उतरताच एका पाणसाठ्याने आमचा मार्ग अडवला. साधारण . फूट खोल / फूट लांब अश्या त्या पाण्यातून शेवाळलेल्या दगडांवरून आम्ही कौशल्याने मार्ग काडून पलीकडे गेलो. आता तीव्र उतार सुरु झाला होता. नाळ अधिकाधिक अरूंद होत होती. कुठेही सपाट मार्ग नव्हता. दरडी, लहानमोठे दगडगोटे यांचा अक्षर्शः तिथे खच पडला होता. पुढे आणखीन एक मोठा 5 फुट खोल असा पानसाठा ट्रेकर्सना कौशल्यपणाने लावून चालण्याचे आव्हान देत होता. अनेक जन तेथेच थांबले. पण काही जणांनी नाळेच्या अरुंद उंच उंच दगडावरून मोठ्या हिमतीने आगेकूच केली. अतिशय थंडगार पाण्यातून चालण्याचा थरारक अनुभव घेतला. नाळेच्या शेवटी सह्याद्रीचे उग्र दर्शन होते. 3500 फुट सरळ तुटलेले कडे व रतनगडाचा कडा प्रेक्षणीय दिसत होता.
पुन्हा परतताना दगडावरुन पानसाठ्यातूनं येताना हृदयाची स्पंदने भेदून निघत होती.अप्रतिम निसर्ग नवलाने आम्ही अवाक झालो होतो. आता मात्र बेदम भूक लागलेली. साधे घरगुती पिठले भाकरी खावूनही तृप्तता आली. रात्री पुन्हा अनेक आठवणी मनात ठेवून नांदेड कडे प्रयाण केले.
ट्रेकिंग ने सगळं आयुष्य हिरवेगार राहत. मन कायम आकाशासारख भरून उरत. आणि विचारधारा कोसळत राहतात.निसर्ग हा संगीतकार,वृक्षवल्ली- गीतकार, पर्वतराजी-गायक ह्या सर्वांच्या मैफिलीला आम्ही खळाळून प्रतिसाद द्यायलाच हवा.
-डॉ.अर्चना लक्ष्मीकांत बजाज
