नांदेड(प्रतिनिधी)-कंधार तालुक्यातील गऊळ येथे आपल्या बापाच्या नावावर असलेल्या जमीनीवर मातंग बांधवांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविला आणि कोणी तरी त्यात विरजण टाकले. त्यानंतर घरात घुसून पोलीसांनी मातंग बांधवांना मारहाण केली. त्यात महिला, अबालवृध्द आणि बालके सुध्दा सुटली नाहीत. या निषेधार्थ आज मातंग बांधवांनी अर्धनग्न आवस्थेत आयटीआय चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढून निषेध व्यक्त केला.
2 सप्टेंबर रोजी गऊळ येथे घडलेल्या प्रकारानंतर हळहळू आपल्यावर झालेला अन्याय व्यक्त करण्यात लोक पुढे आले. आज या संदर्भाने एका मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. कांही मातंग बंधूनी आपले शर्ट काढून कंबरेला बांधले अशा अर्धनग्न अवस्थेत हा मोर्चा आयटीआय चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आला. आज दिलेल्या निवेदनात साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा हटवून महिला व पुरुषांवर लाठी हल्ला केला. प्रशासनाने पुतळ्याची पुर्नस्थापना करण्याचे आश्र्वासनही दिले पण ते पाळले नाही. तसेच मारहाण करणाऱ्या पोलीसंावर गुन्हा दाखल करावेत या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात प्रा.रामचंद्र भरांडे, मारोती वाडेकर, विष्णु कसबे, सचिन साठे, राजाभाऊ सूर्यवंशी, व्ही.जी. डोईवाड, गंगाधर गायकवाड, गणेश तादलापूरकर, प्रा.राजू सोनसळे, उत्तम बाभळे, भारत सरोदे, परमेश्र्वर बंडेवार, भारत खडसे आदींसह असंख्य समाजबांधव सहभागी झाले होते.