नांदेड (ग्रामीण)

मुखेडमध्ये शौचालयाच्या टॅंकमध्ये दोन कामगाराचा गुदमरून मृत्यू

मुखेड (प्रतिनिधी)-शौचालयाच्या टॅंक मधील घाण बाहेर काढत असतांना दोन मजुरांचा तोल जाऊन टॅकमध्ये पडल्याने त्या दोघांचा गुदमरून जागीच मृत्यु झाल्याची घटना रविवारी रात्री 11 च्या सुमारास घडली. दरम्यान या मजुरांचा मृतदेह सोमवारी सकाळी 7 वाजता बाहेर काढण्यात आला या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि मुखेड शहरातील अशोकनगर भागात राहणारे सेवानिवृत्त शिक्षक तुकाराम सुर्यवंशी यांच्या घराच्या शौचालयाचे टॅंक नादुरुस्त झाल्याने सुर्यवंशी यांनी टॅंक दुरुस्तीसाठी शहरातील फुलेनगर भागातील मजुरांना ठेका दिला. 5 मजुर रविवारी रात्री 10 वाजता शौचालय टॅंक मधील घाण काढण्यासाठी त्यांच्या घरी गेले. रात्री 11 वाजेपर्यंत सुरळीत काम सुरु होते.टॅंकमधील घाण काढण्यासाठी मजुर मारोती रामा चोपवाड (वय 30 वर्ष) हा टॅंकमध्ये उतरुन घाण काढत असतांना टॅंकमधील भिंंतीवर टेकलेले पाय घसरुन मोरोती चोपवाड हा टॅंकमध्ये पडला असता त्यांना वाचवण्यासाठी नागेश व्यकंटी घुमलवाड (वय 25 वर्ष) यांनी आपला हात त्यांना देवून वर काढण्याच्या प्रयत्नात व्यकंटी घुमलवाड यांचा ही तोल जाऊन दोघे ही टॅंकमध्ये पडले. या दोघांना वाचवण्यासाठी घरमालक, कामावर सोबतचे तीन मजुर व शेजारी यांनी प्रयत्न केले. पण प्रयत्न निष्फळ ठरल्यामुळे बिलोली येथुन शौचालय सफाईचे टॅंकर बोलावून टॅंक साफ केला आसता टॅंकमध्ये पडलेले मारोती चोपवाड व नागेश घुमलवाड हे मृत अवस्थेत आढळले. सकाळी 7 वाजता टॅंकमधुन या दोघाचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, मा.सरपंच बापुराव कांबळे जुन्नेकर यानी भेट देऊन परिस्थितीची पहाणी केली. मौलाजी रामा आडगुलवार यांच्या खबरीवरून मुखेड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली. पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष केंद्रे पुढील तपास करीत आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *