नांदेड(प्रतिनिधी)-बोगस माहिती अधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य या बनावट समितीच्या लेटर पॅडवर दिलेल्या अर्जाचा वजिराबाद पोलीसांनी संपादकाविरुध्द धार्मिक तेढ निर्माण करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. पण ही बोगस समिती आणि त्याची नोंदणी मात्र विचारण्यात आलेली नाही.
माहिती अधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.शेख जाकीर शेख सगीर (महाराष्ट्र भूषण) ज्यावर नोंदणी क्रमांक एफ 0023330/एनएनडी (एम.एच.) असे लिहिलेल्या एका लेटर पॅडवर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष पवन बोरा उर्फ शर्मा यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यात कलमांसह गुन्हा दाखल करण्याचा अर्ज दिला. या लेटर पॅडवर लिहिलेल्या नोंदणी क्रमांकानुसार जन माहिती सेवा समिती ही नोंदणी कार्यालय अर्धापूर येथे नोंदणीकृत आहे.
या अर्जात नांदेड चौफेरचे संपादक पठाण मोहम्मद आरेफ खान दुल्लेखान रा.देगलूर नाका, सलाम चावलवाला कॉम्प्लेक्स यांनी त्यांच्या वर्तमान पत्रात जैन, मारवाडी कोमटी मुस्लीम समाज धान्य घोटाळ्याचे सुत्र धार असून या गोरख धंद्यात समाजाची बदनामी करून दोन्ही समाजात तेढ निर्माण करून मारवाडी, जैन समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी आरेफ खान यांच्याविरुध्द कलम 295(अ) आणि 505 (2) प्रमाणे कायदेशीर गुन्हा नोंद करणे बाबत असा विषय लिहिला आहे.
या अर्जावर वजिराबाद पोलीसांनी गुन्हा क्रमांक 317/2021 कलम 295(अ), 505(2) भारतीय दंड संहितेप्रमाणे दाखल केला आहे. कोणत्या कायद्याची कलमे आपण लिहिली हेच माहित नसणाऱ्या पवन बोरा उर्फ शर्मा यांच्या अर्जावर वजिराबाद पोलीसांनी भारतीय दंड संहिता जोडली आहे. दोन जातीमध्ये मतभेद होवून त्याचे रुपांतर जातीयवादीवर येवून सोडावे या उद्देशाने आमच्या मारवाडी, जैन, कोमटी समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून न्याय द्यावा अशी मागणी या अर्जात केली आहे.
या संदर्भाने नांदेड चौफेरचे संपादक मो.आरेफ खान पठाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, माझ्या लिखाणात काही चुक झाली असेल तर मी कायद्यापेक्षा मोठा नाही. पण त्यांनी एक मजेशीर बाब सांगितली. ज्यामध्ये माहिती अधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य या लेटरपॅडवर असलेला नोंदणी क्रमांक बोगस असल्याची पण चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर कार्यवाही व्हावी. मारवाडी या शब्दाचा अर्थ सांगतांना मोहम्मद आरेफ खान पठाण म्हणाले मारवाडी हा शब्द जातीवाचक नाही. राजस्थानमधील मारवाड या प्रांतात राहणारा प्रत्येक जाती धर्माचा प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वत:ला मारवाडी असे संबोधीत करतो. त्यामुळे मारवाडी हा शब्द जातीवाचक होवूच शकत नाही.
सोबतच पवन बोरा उर्फ शर्मा यांच्या नावात उर्फ शर्मा का लागले याचा शोध घेतला तर पोलीस अभिलेखात भारतीय दंड संहितेतील समाजाला त्रास देणाऱ्या भारतीय दंड संहितेतील अनेक कलमांचे सविस्तर विवरण समोर येईल. याबाबत सुध्दा चाचपणी पोलीसांनी केली पाहिजे आणि पोलीस अभिलेखात पवन शर्मा नावाच्या अभिलेखाची पडताळणी केली पाहिजे अशी मागणी नांदेड चौफेरचे संपादक मो.आरेफ खान पठाण यांनी वास्तव न्युज लाईव्हशी बोलतांना केली.
