नांदेड(प्रतिनिधी)-भोकर शहरातील एका विधवा महिलेने पोलीस निरिक्षक विकास पाटील, पोलीस उपनिरिक्षक अनिल कांबळे यांच्यासह इतर आठ ते दहा जणांविरुध्द कट रचून आपल्याविरुध्द केलेल्या खलबतासाठी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आपले अर्ज गृहमंत्री, मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक यांना पण दिले आहेत. मागणी पुर्ण झाली नाही तर 27 सप्टेंबर पासून आझाद मैदान मुंबई येथे कुटूंबासह आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.
भोकर येथील विधवा महिला उषाताई सुरेश नर्तावार यंानी दिलेल्या अर्जानुसार त्यांना दोन मुले विशाल उर्फ विक्की, दिनेश व दिपा अशी तीन आपत्ते आहेत. त्यातील मुलगी दिपाचे लग्न झाले आहे. त्यांचा मुलगा विशाल हा एम.एच.26 बी.सी.1883 ही 4 चाकी गाडी चालवतो उषाताईचे भोकर न्यायालयासमक्ष झेरॉक्स दुकान आहे. 25 जुलै 2021 रोजी अज्ञात वाहनाच्या धडकेत भोकर येथे विलास भगवान हटकरचा मृत्यू झाला. माझी मुलगी दिपा आजारी असल्याने आम्ही तिला भेटण्यासाठी मी व विशाल उर्फ विक्की 26 जुलै रोजी मुंबईकडे रवाना झालो. पुढे पोलीस तपासामध्ये ते अज्ञात वाहन माझा मुलगा विशाल उर्फ विक्की चालवत होता अशी उलट सुलट चर्चा सुरू झाली आणि 29 जुलै रोजी भोकर येथील पोलीस अंमलदार नामदेव जाधव यांचा फोन आला व विशाल यास तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये हजर करा असा आदेश देण्यात आला. याबाबत माहिती घेतली असता एफआयआरमध्ये अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे विलास भगवान हटकरचा मृत्यू झाला होता. पोलीस निरिक्षक विलास पाटील व उपनिरिक्षक अनिल कांबळे यांनी आमच्यावर प्रचंड दबाव आणला. तसेच गुन्ह्यात सवल व संरक्षण पाहिजे असेल तर येवून साहेबांना भेटा व 7 लाख रुपये द्या अशी मागणी करण्यात आली. आम्ही 1 लक्ष रुपये देण्याची तयारी दाखवली. पण 7 लक्ष देणे आमच्या आवाक्या बाहेर होते.
घटनेच्या पाच दिवसानंतर 30 जुलै रोजी देविदास हटकर यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्याकडून तक्रार घेवून माझा मुलगा विशाल विरुध्द गुन्हा दाखल करणयात आला. त्यानंतर आम्ही 16 ऑगस्ट रोजी भोकर येथील आपल्या घरी आलो आणि 17 ऑगस्ट रोजी पोलीस उपनिरिक्षक अनिल कांबळे आमच्या घरी आले. पोलीस स्टेशनला तात्काळ विशालला हजर करा, पैसे घेवून या नाही तर तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील असे सांगितले. फौजदारी न्यायालय भोकर येथे विशालने स्वत: हजर होवून जामीन अर्ज दिला आणि न्यायालयाने तो अर्ज मंजुर केला. त्यानंतर सायंकाळी 5.30 वाजेच्यासुमारास हटकर व त्यांचे इतर कुटूंबिय माझ्या झेरॉक्स दुकानात शिरले माझ्या दुकानाची तोडफोड केली. गाडीची तोडफोड केली. याबाबतची तक्रार घेवून गेलो तेंव्हा भोकरचे पोलीस निरिक्षक विकास पाटील यांनी मीच असे करायला लावले असे सांगितले. रात्री 2 वाजता माझ्याकडून कांही कोऱ्या कागदांवर पोलीसांनी सह्या घेतल्या आणि आम्हाला पुन्हा भोकरमध्ये न दिसण्याची सुचना केली.
पोलीसांशिवाय न्यायालयात गुन्ह्याचा जामीन करून घेतल्याचा राग मनात धरून विकास पाटील, अनिल कांबळे यांनी 7 लक्ष रुपये न दिल्यामुळे आमच्याविरुध्द असा कट केल्याचा आरोप उषाताई नर्तावार करतात. या बाबत त्यांनी 28 ऑगस्ट रोजी पोलीस ठाणे अंमलदार भोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी भोकर, अपर पोलीस अधिक्षक भोकर आणि नांदेडचे पोलीस अधिक्षक यांनाही तक्रारी अर्ज दिले. सोबतच घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण, फोटो सर्व साहित्य दिले आहे. तरीपण अद्याप कांही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आता उषाताई नर्तावार यांनी 27 सप्टेंबरपासून आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन दिले आहे.
