नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड खंडेलवाल समाजातील पहिल्यांदा युवतीने सनदी लेखापाल (चार्टड अकाऊंटंट) ही परिक्षा उत्तीर्ण करून नांदेड जिल्ह्यातील सर्व खंडेलवाल समाजाचे नाव उंचीवर नेण्याचा प्रयत्न प्रत्यक्षात आणला आहे. सनदी लेखापाल ही पदवी प्राप्त करणाऱ्या काजल गोपीकिशन शर्मा यांचे कौतुक होत आहे.
नांदेड येथे गोपीकिशन राधाकिशन शर्मा यांच्या दोन मुली आहेत. एक कोमल आणि एक काजल. काजलने आपले प्राथमिक शिक्षण युनिव्हर्सल इंग्लीश स्कुलमधून प्राप्त केले. 10 वीच्या परिक्षेत 82 टक्के गुण घेवून त्यांनी यश मिळवले. त्यानंतर त्यांनी 11 ते पदवी वाणिज्य शाखेतून पुर्ण करतांना यशवंत महाविद्यालय नांदेड येथे आपला अभ्यासक्रम पुर्ण केला.12 बोर्डाच्या परिक्षेत त्यांनी वाणिज्य शाखेत 92 टक्के गुण प्राप्त केले. त्यानंतर सीपीटी ही प्राथमिक परिक्षा उत्तीर्ण करून द इंस्टीटूट ऑफ चार्टड अकाऊंटंट ऑफ इंडिया नवी दिल्ली येथे प्रवेश प्राप्त केला. नांदेड येथील सनदी लेखापाल प्रविण पाटील यांच्याकडे दोन वर्षाचे आर्टीकलशिप पुर्ण केले आणि सनदी लेखापालाची अंतिम परिक्षा प्राप्त करतांना त्यांनी 800 पैकी 465 गुण प्राप्त केले. सनदी लेखापालाची परिक्षा दोन वेगवेगळ्या सत्रांमध्ये देता येते. काजल गोपीकिशन शर्मा यांनी या दोन्ही सत्रांना एकदाच परिक्षा देवून त्यात यश संपादन केले. ही त्यांची विशेषत: आहे. नांदेड जिल्ह्यातील खंडेलवाल समाजामध्ये पहिल्यांदाच कोणी विद्यार्थ्याने सनदी लेखापाल ही परिक्षा पास केली आहे. या त्यांच्या यशाचे कौतुक करण्यासाठी पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल, गोपीकिशन शर्मा, ऍड. दिपक शर्मा, कंथक सूर्यतळ, सफल खंडेलवाल यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना भविष्यातील कामगिरीसाठी शुभकामना दिल्या.
मोठ्या बहिणीचा त्याग
काजल पेक्षा मोठी बहिण कोमल गोपीकिशन शर्मा यांनी फॅशन डिझाईनींगसाठी प्रवेश मिळवला होता. पण आर्थिक बाबींचा विचार करून तसेच छोटी बहिण काजल यांच्या सनदी लेखापाल या ध्येयाला पाठबळ देण्यासाठी कोमल यांनी आपले शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी कामकाज सुरू केले. त्यानंतर काजल शर्मा यांना मिळालेल्या पाठबळावरच त्यांनी सनदी लेखापाल ही पदवी प्राप्त करण्यात यश मिळवले. आपली आई निशा यांचाही आपल्या उज्वल ध्येयाकडे वाटचाल करण्यातील वाटा महत्वपूर्ण असल्याचे काजल शर्मा सांगतात.