नांदेड(प्रतिनिधी)- गोदावरी नदीत धोक्याच्या पातळीपर्यंत वाढलेले पाणी कमी झाले. दि.13 आणि 14 सप्टेंबर जिल्ह्यात येलो अलर्ट असतांना सुध्दा नवीन आलेल्या वाळूचा धंदा पुन्हा एकदा सुरू झाला आहे.
गोदावरी नदीचे पात्र हे वाळू माफियांसाठी एक मोठी पर्वणी आहे. नदी पात्रात जमलेली वाळू काढून अव्वाच्या सव्वा भावाने विकणे आणि त्यातून मोठी कमाई करणे हा धंदा अव्याहत सुरूच असतो. या वाळू व्यवसायावर नियंत्रण ठेवण्याचे मुळ काम महसुल विभागाचे आहे. त्यांना पाठराखण पोलीस विभाग देत असतो. पण या वाळूच्या धंद्यातून मिळणारा मलिदा सुध्दा या दोन्ही विभागांकडे वाटला जात असतो.
मागील आठवड्यापर्यंत नांदेडच्या गोदावरी पाट ओथंबून वाहत होतो. विष्णुपूरी प्रकल्पातून लाखो दशलक्ष लिटर पाणी सोडण्यात आले. प्रकल्पातून सोडलेल्या पाण्यामुळे नदीपात्रात पाण्याचा फुगवटा तयार झाला. त्यामुळे बरेच दिवस पाणी नदीपात्रात स्थिर राहिले. हळूहळू पाणी ओसरत गेले आणि 12 सप्टेंबर रोजी नदीपात्र एकदम खालच्या पातळीवर आले. या सर्व प्रकारामध्ये प्रकल्पातून सोडलेल्या पाण्याने मागे काढलेल्या वाळूच्या खड्यांना पुन्हा एकदा भरून टाकले. त्यामुळे वाळू माफियांना ही पर्वणीच ठरली. मागे त्यांनी नदीपात्रात अनेक खड्डे पाडून वाळू उपसली होती ती आता पुन्हा एकदा भरली आहे आणि यातूनच त्यांचा नवीन वाळू धंदा सुरू झाला आहे.
वाळूच्या अवैध व्यवसायावर नियंत्रण ठेवणाऱ्या जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयाचे अंतर नांदेडच्या गोदावरी नदीकाठावरील गोवर्धनघाट येथून 1 किलो मिटरपेक्षा कमी अंतरात आहे तरीपण वाळू माफियांनी आपला हा वाळूचा अवैध व्यवसाय पुन्हा एकदा जोरदारपणे सुरू केला आहे. या धंद्यावर वचक येईल न येईल याबद्दल आज सांगता येणार नाही पण वाळू माफियांना निसर्गाने भरपूर वृष्टी करून त्यांच्यासाठी नवीन वाळू तयार करून दिली आहे. याबद्दल निसर्गालाच धन्यवाद द्यायला हवे. कारण त्यांचा व्यवसाय चालणे निसर्गावरच अवलंबून आहे.
