नांदेड (प्रतिनिधी)- रेल्वेत टी.सी. आणि लिपीक पदाची नौकरी लावतो 30 लाख 10 हजार रूपयांची फसवणुक करणाऱ्या आई-वडील आणि पूत्र अशा तिघांना देगलूरचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुधीर बरडे यांनी 7 दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
देगलूर येथील यशवंत कालीदास बिरादार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार देगलूर येथील रामपूरकर रोडवर राहणारे मधुकर विठ्ठलराव पाटील, त्यांची पत्नी माहदाबाई आणि त्यांचा पूत्र प्रताप या तिघांनी यशवंतराव बिरादारसह इतर सहा जणांकडून कधी बॅंकेच्या खात्यावर तर कधी रोखीने असे 30 लाख 10 हजार रूपये घेतले. या लोकांना रेल्वे विभागात क्लर्क आणि तिकीट तपासणीसची नौकरी लावतो असे आमीष दाखविले होते. पैसे घेतल्यावर बनावट प्रकारचे नियुक्तीपत्र आणि प्रशिक्षण पत्र सुद्धा या लोकांना दिले. पण आपली फसवणुक झाल्याचे कळल्यानंतर या लोकांनी तक्रार दिली. देगलूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा क्र. 398/2021 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक रवी मुंडे यांच्याकडे देण्यात आला.
दि. 11 सप्टेंबर रोजी देगलूर पोलिसांनी 30 लाखांपेक्षा जास्तीची फसवणुक करणाऱ्या मधुकर पाटील, माहदाबाई पाटील आणि प्रताप पाटील या तिघांना अटक केली. आज 12 सप्टेंबर रोजी पोलिसांनी या तिघांना देगलूर न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली असता न्यायालयाने या तिघांना सात दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
