क्राईम

कायदाच अस्तित्वात नसताना अर्धापूर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात मुख्याध्यापकाला अटकपूर्व जामीन मंजूर

नांदेड (प्रतिनिधी)- जो कायदाच आस्तित्वात नाही अशा कायद्यानुसार एका मुख्याध्यापकाविरूद्ध अर्धापूर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात नांदेड येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.एन. गौतम यांनी या मुध्याप्यापकाला दिलेला आंतरीम अटकपूर्व जामीन कायम केला आहे. या मुख्याध्यापकाला आपल्या जीवनात अनेक त्रासांना सोसावे लागले. पण प्रत्येक वेळेस न्याय देवतेनेच या मुख्याध्यापकावर न्याय केला.
अर्धापूर शहरात अर्धापूर एज्युकेशन सोसायटी आहे. या सोसायटीच्यावतीने एकबाल उर्दू मॉडेल हायस्कूल चालविले जाते. या हायस्कूलमध्ये सन 1993 मध्ये सय्यद युसूफ सय्यद मुसा यांची शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. कामकाज चालले असताना संस्थेने शिक्षक सय्यद युसूफ सय्यद मुसा यांना सन 2003 मध्ये मुख्याध्यापकपदी पदोन्नती दिली. मग मात्र काही तरी भानगडी होत राहिल्या आणि या भानगडींमधून मुख्याध्यापक सय्यद युसूफ सय्यद मुसाविरूद्ध अनेक तक्रारी, अनेक खटले दाखल झाले. पण प्रत्येकवेळी न्यायदेवतेने आपल्याला न्याय दिला, अशी सय्यद युसूफ सय्यद मुसा यांची मानना आहे. मुख्याध्यापक सय्यद युसूफविरूद्ध संस्थेचे अध्यक्ष सय्यद वासीम बारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अर्धापूर पोलिसांनी गुन्हा क्र. 162/2021 दाखल केला. यामध्ये भारतीय दंड संहितेची कलम 420, 409, 468, 471 आणि 2 बाल नियमांचा संरक्षण कायदा 2005 जोडण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार सय्यद वासीम बारी सुद्धा धर्मादाय आयुक्त कार्यालयातील नियमावलीप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष नाहीत. तरी पण त्यांनी ही तक्रार दिली. अर्धापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर मुख्याध्यापक सय्यद युसूफ सय्यद मुसा यांनी न्यायालयात फौजदारी जामीन अर्ज क्र. 498/2021 दाखल करून अटकपूर्व जामीन मागितला. या प्रकरणात नांदेडचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.एन. गौतम यांनी मुख्याध्यापक सय्यद मुसा यांना अंतरीम जामीन दिला होता. या संदर्भात न्यायालयाने पोलिसांना विचारणा केली की, 2 बाल नियमांचा संरक्षण कायदा 2005 हा कायदा अस्तित्वात आला आहे आणि भारतात प्रचलित आहे, याचा पुरावा द्या. अर्धापूर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलमांवर भर देऊन अटकपूर्व जामीन देण्यास विरोध केला तेव्हा न्यायालयाकडून असे सांगण्यात आले की, दोन बाल नियमांचा संरक्षण कायदा अस्तित्वात असेल तरच भारतीय दंड संहितेचा कलमांचा विचार करता येईल, अशी माहिती सय्यद युसूफ सय्यद मुसा यांचे वकील ऍड. मोहम्मद मोहियोद्दीन यांनी दिली. एकूण अखेर पोलिसांनी 2 बाल नियमांचा संरक्षण कायदा न्यायालयाला दाखविला किंवा तो भारतात प्रचलित आहे हेही दाखविले नाही, त्यामुळे न्यायालयाने मुख्याध्यापक सय्यद युसूफ सय्यद मुसा यांना अटकपूर्व जामीन कायम केला आहे. आजपर्यंत सय्यद युसूफ सय्यद मुसा यांना अनेकदा निलंबीत करण्यात आले. एकदा बडतर्फ करण्यात आले तरी पण न्यायालयाने सय्यद युसूफ सय्यद मुसा यांना न्याय दिला.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *