


या घटनेत सर्वात दुर्देवाची बाब अशी दिसली की, असंख्य लोक हा प्रकार पाहत होते पण कोणीही मारेकऱ्यांना प्रश्न विचारलेला नाही. उलट लोक दुरून मजा पाहत होते असे त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते. 11 वी वर्गात शिकणाऱ्या दोन बालकांचे इतरांशी काय वैर असेल हा प्रश्न या खूनाच्या घटनेतून समोर आला आहे. यासाठी समाजाने संस्काराची जोड आपल्या बालकांना देण्याची नितांत गरज आहे असेच म्हणावे लागेल.
आमदार जवळगावकर यांनी जखमी असलेल्या सोहमचीपण भेट घेतली. पत्रकारांसमोर बोलतांना जवळगावकर म्हणाले घडलेली घटना भयंकर आहे. पोलीस अर्धा तासपर्यंत घटनास्थळी आले नाहीत ही बाब गंभीर आहे. याबाबत मी पोलीस अधिक्षकांशी बोलणार आहे. मागील कांही घटनांचा उल्लेख करून आ.जवळगावकर यांनी पोलीसांनी योग्य आणि कडक भुमिका घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. परिसरात सुरू असलेले अवैध धंदे सुध्दा बंद झाले पाहिजेत असे आ.जवळगावकर सांगत होते. मयत यशचे वडील यांची परिस्थिती तर शब्दात लिहिण्याची ताकत आमच्या लेखणीत पण नाही. मात्र आजच्या नंतर तरी असे प्रकार घडणार नाहीत याची दक्षता घेण्याची नक्कीच गरज आहे आणि तो भाग फक्त पोलीसांचा आहे. प्राप्त माहितीनुसार एका मारेकऱ्याला पोलीसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. कोणत्याही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या धरपकडीला दुजोरा दिलेला नाही. यश मिरासेचा खून आणि सोहम चायलवर हल्ला का झाला याचे कारण सुध्दा महत्वपूर्ण आहे. अद्याप त्या कारणाची माहिती प्राप्त झाली नाही. पण सर्वसामान्यपणे 11 वी वर्गात शिकणाऱ्या बालकांसाठी ही घटना धक्कादायक आहे. त्यांनी आपण काय करावे या पेक्षा आपण काय करू नये यावर लक्ष केंद्रीत केले तर समाजात अशा प्रकारचे हल्ले पुन्हा होणार नाहीत.
