नांदेड(प्रतिनिधी)-ग्रामीण भागात व्याजाने पैसे देवून शेत जमीन लिहुन घेण्याचे प्रकार घडतात. अशाच एका प्रकरणात हिब्बट ता.मुखेड येथे एका व्यक्तीच्या आत्महत्येप्रकरणी चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिब्बट ता.मुखेड येथील सतिश अशोकराव मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.7 सप्टेंबर रोजी रात्री 9.30 ते 8 सप्टेंबरच्या पहाटे 4 वाजेदरम्यान त्यांचे वडील अशोकराव यांनी आपल्या घरातच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. अशोकराव मुंडे यांनी आपल्या भावाच्या शिक्षणासाठी आपल्या वडीलोपार्जित शेत जमीन गट क्रमांक 180 मधील 2 हेक्टर 17 आर जमीन रावसाहेब माधवराव उपासे यांना परत बयनामा या बोलीवर त्यांच्या नावे करून दिली होती. रावसाहेब उपासेकडून अशोकराव यांनी 2 लाख रुपये 4 टक्के व्याजाने घेतले होते. अशोकरावकडून या जमीनीचा बयनामा व्यंकटेश रावसाहेब उपासे यांच्या नावे करून देण्यात आला.व्याजाने घेतलेले पैसे परत देवून सुध्दा उपासे कुटूंबिय अशोकरावला जमीनीचा बयनामा पुन्हा करून देत नव्हते. या त्रासाला कंटाळूनच त्यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली आहे.
या तक्रारीवरुन मुखेड पोलीसांनी गुन्हा क्रमांक 265/2021 कलम 306, 34 भारतीय दंडसंहितेनुसार दाखल केला. या गुन्ह्यात आरोपी या सदरात रावसाहेब माधवराव उपासे, विजयमाला रावसाहेब उपासे, व्यंकटेश रावसाहेब उपासे आणि नागनाथ उमाटे अशा चार जणांची नावे आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक गोबाडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक अनसारी हे करीत आहेत. घटनास्थळाला भेट देण्यासाठी देगलूरचे पेालीस उपअधिक्षक सचिन सांगळे यांनी सुध्दा आले होते आणि तपासाच्या संदर्भाने योग्य सुचना दिल्या आहेत.
