नांदेड(प्रतिनिधी)-बिना ढोल ताशांच्या गजरात श्री गणेशाचे आगमन आज झाले. कांही-कांही ठिकाणी गणपती बाप्पा मोरया चा गजर अत्यंत कमी आवाजात ऐकायला मिळाला आहे. कांही जण सांगत होते या आवाजत सायंकाळी भर पडेल. पण ऐकूनच कोरोना महामारीच्या पार्श्र्वभूमीवर श्री गणेशाचे आगमन आणि त्यांची आराधना करण्यात सर्वांनाच रस दिसत होतो.
भाद्रपद महिन्याची चतुर्थी हा दिवस गणेशोत्सवाचा प्रारंभ करणारा आहे. आज दि.10 सप्टेंबर रोजी ही चतुर्थी आलेली आहे. नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्रात पाणी धोक्याच्या पातळीच्या अत्यंत जवळ आले होते. पण सुदैवाने दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे त्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली नाही. दि.8 सप्टेंबर पासून श्री गणेशांच्या मुर्ती विक्री करणाऱ्या लोकांनी आपली दुकाने वॉटरप्रुफ टेंटमध्ये लावली होती. या यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान ज्या-ज्या ठिकाणी विक्रीचे दुकान होते. त्यात कोविड नियमावलीप्रमाणे चार फुट उंचीपेक्षा जास्त मोठी मुर्ती नव्हती. कांही ठिकाणी गणेशमंडळांनी बऱ्याच मोठ्या गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. 8 सप्टेंबरपासूनच दुर्वा, फुल, केळीची पाने, आघाडा आणि विविध पाने फुले विक्रीची दुकाने शहरभर अनेक ठिकाणी पसरलेली होती.
खरेदी 8 सप्टेंबरपासूनच सुरू होती पण आज 10 सप्टेंबर रोजी सकाळपासूनच बाजारपेठेमध्ये वर्दळ दिसली. प्रत्येकाला आपल्या आवडीची गणेशमुर्ती घ्यायची होती. सोबतच गणेशमुर्तीची आरास करण्यासाठी विविध सुशोभिकरण करणाऱ्या वस्तुंची विक्री होत होती. घरात सर्वत्रच अत्यंत उत्साहात आप-आपल्या गणेशमुर्तींची पुजा-अर्चा करून आनंद व्यक्त करण्यात आला. मोदकांचा प्रसाद सर्वत्र मिळत होता. कांहीशी खंत बॅन्ड बाजाची होती पण कोविड नियमावलीमुळे हा प्रकार यंदाच्या वर्षी सलग दुसऱ्यांदा कमी प्रमाणात दिसला. कांही बालके आपल्या तोंडूनच गणपती बापा मोरयाचा जय घोष करतच आपल्या गणेशमुर्ती मंडळाकडे घेवून जात होते.
अत्यंत कमी गर्दीत, पण भरपूर उत्साहात श्री गणेशाची प्रतिष्ठापणा करून प्रत्येकाने कोरोना महामारीतून मुक्त करावे अशीच विनंती सर्वांचे कल्याण करणाऱ्या भगवान श्री गणेशाकडे केली. कोरोना महामारीच्या काळात दुसऱ्यांदा आलेला हा गणेशोत्सव सर्वांच्या स्मरणात राहिल. गणेशोत्सव साजरा करतांना प्रत्येकाने कोविड नियमावलीचे पालन करून सहभाग घ्यावा, आपली स्वत:ची काळजी घ्यावी आणि इतरांची काळजी करावी अशी विनंती आम्ही सुध्दा करत आहोत.
