नांदेड(प्रतिनिधी)-जोरदार झालेल्या वृष्टीने नांदेडकडून तेलंगणात प्रवेश करण्यासाठी गोदावरी नदीवर असलेला मौजे येसगी येथील पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या पुलात दोन खांबांना तडे गेल्याची माहिती आहे.
मागील आठवड्यात वरुण राजाने जोरदार पर्जन्यवृष्टी केली त्याचा परिणाम सर्व सामान्य माणसाच्या जीवनावर झाला. त्यात अनेक ठिकाणी संपर्क रस्ते तुटले, अनेक जण पुरात वाहुन गेले, विष्णुपूरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर कांही प्रेते सापडली. अनेक शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाण्याने आपला प्रभाव दाखवला.
सर्वच ठिकाणी पुलांवरून जातांना आणि येतांना अशा वेळेस दक्षता घेणे आवश्यकता आहे याचाच भाग म्हणून नांदेडमधून तेलंगणाकडे जाण्यासाठी गोदावरी नदीवरील मौजे येसगी ता.बिलोली येथे असणारा पुल वाहतुकीसाठी बंद करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी दिल्या आहेत. हा पुल क्षतीग्रस्त झाला आहे. म्हणून या पुलावरील सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी हा पुल बंद करण्यात आला आहे. या पुलाचा पर्याय म्हणून बिलोली शहराकडून बोधनकडे जाण्यासाठी बिलोली-कुंडलवाडी-धर्माबाद असा मार्ग सुचवला आहे. तसेच नांदेडकडून हैद्राबादकडे जाणारी वाहने नांदेड-नरसी-देगलूर-मदनूर असा प्रवास करते.सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलासमोर मोठ-मोठे मुरुमाचे ढिगार लावून हा रस्ता बंद केला आहे. यावर पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्यावतीने पोलीसचे पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर धुमाळ, पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे हेलक्ष ठेवून आहेत.