नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम जारी केल्यानंतर त्यात सुधारणा करत 2021 मध्ये नवीन बाजार मुल्य तक्ता तयार केला. या पार्श्र्वभूमीवर नांदेडचे मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांच्या स्वाक्षरीने नांदेड शहरात सुध्दा नवीन दर निश्चिती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधीन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) अधिनियम 2001 च्या कलम 3 मध्ये, पोट कलम 1 मध्ये सुधारणा करत सन 2021 मध्ये नवीन राजपत्र अंमलात आणले. यानुसार नांदेड शहर महानगरपालिकेने ठराव क्रमांक 106 दि.30 ऑगस्ट 2021 नुसार गुंठेवारी विकास नियमाधीन प्रकरणांमध्ये विकास शुल्क व इतर दर निश्चितीस मान्यता प्रदान केली. गुंठेवारी विकास करतांना महाराष्ट्र नगर रचना व प्रादेशीक अधिनियम 1966 च्या कलम 124(ब) नुसार नांदेड महानगरपालिकेने नवीन दर/ शुल्क निश्चित केले आहेत.
छाननी शुल्क या सदरात 15 हजार रुपये प्रति एकर किंवा त्यापेक्षा कमी भागासाठी. बांधकाम क्षेत्र 4 रुपये प्रति चौरस मिटर आणि याच विषयामध्ये विकास आकार भुंखड क्षेत्रावर 540 रुपये प्रति चौरस मिटर असा निश्चित करण्यात आला आहे. प्रशमन शुल्क या सदरात निवासी भुखंडांसाठी 0.50 टक्के, औद्योगिक भुखंडासाठी 0.75 टक्के, वाणिज्य भुखंडावर 1.00 टक्के, या पुढे बांधकाम क्षेत्रावर निवासी असेल तर 2 टक्के औद्योगिक असेल तर 3 टक्के आणि वाणिज्य असेल तर 4 टक्के असा दर ठरविण्यात आला आहे. या पुढे 0.5 अतिरिक्त क्षेत्राकरीता 100 टक्के आणि 34 टक्के असा दर निश्चित केला आहे. ऍन्सलरी क्षेत्र यामध्ये 100 टक्के आणि 10 टक्के असा दर निश्चित केलेला आहे.
ज्या मिळकतीचे क्षेत्र 125 चौरस मिटर किंवा त्यापेक्षा कमी असेल तर अशा मिळकतीकडून 50 टक्के रक्कम आकारण्यात येईल. चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) याबाबत निर्णय घेतांना आणि मोकळ्या भुखंडाचे गुंठेवारी विकास प्रस्ताव छाननी करतांना वर लिहिलेल्या दराप्रमाणे नवीन निश्चिती करण्यात यावी असे या आदेशात लिहिले आहे. हा आदेश महानगरपालिकेच्या आयुक्तांनी 7 सप्टेंबर 2021 रोजी स्वाक्षरीत केला आहे.
